निधी आणि जागेसाठी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार
राजगुरूनग- खेड-सिन्नर महामार्गावरील स्वतंत्र बाह्यवळण कामाची दुसऱ्या टप्यातील राजगुरुनगर शहर व मंचर शहर बाह्यवळणांची निविदा निघाली आहे. या कामासाठीचा मंजूर निधी केंद्राकडून लवकर वितरीत व्हावा व रस्ते कामासाठी आवश्यक जागा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ताब्यात मिळावी याकरिता नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
आढळराव पाटील म्हणाले, नोव्हेंबर 2017 पासून या महामार्गावरील बाह्यवळणांची कामे रखडली होती. लोकसभेत याविषयी आवाज उठवून तसेच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे चेअरमन, सचिव यांची भेट घेऊन येथील बायपासची कामे पूर्ण झाल्याशिवाय या महामार्गाचा उपयोग होणार नाही हे आपण पटवून दिले.
याची दखल घेऊन 24 ऑगस्ट 2018 रोजी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे चेअरमन व सचिव यांनी प्रकल्पाची पुनर्पडताळणी करुन मूळ ठेकेदाराकडून राहिलेली बाह्यवळणांची कामे डिस्कोप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे व सर्व बाह्यवळणांची स्वतंत्र निविदा काढण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दि. 17 ऑक्टोबर 2018 रोजी मला लेखी पत्राद्वारे कळविले.
त्यानुसार डिसेंबर 2018 मध्ये खेड घाटासह, नारायणगाव, राजगुरुनगर, मंचर, कळंब व आळेफाटा या पाच बाह्यवळण कामांसाठी सुमारे 450 ते 500 कोटींच्या स्वतंत्र निधीला मंजूरी देण्यात आली. मात्र या सर्व कामांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास एकाचवेळी खर्च करणे शक्य नसल्याने ही कामे तीन टप्प्यांत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी वाहतूक कोंडी सर्वाधिक असणाऱ्या नारायणगाव बाह्यवळण व खेड घाट कामाची अल्प मुदत निविदा काढून कामे तातडीने सुरु करण्याची माझी विनंती गडकरी यांनी मान्य केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 22 नोव्हेंबर 2018 रोजी नारायणगाव बाह्यवळण व खेड घाट कामासाठी 89 कोटींची निविदा काढण्यात येऊन लोकसभा निवडणूकीपूर्वी ठेकेदार निवड करण्यात आली व प्रत्यक्ष काम सुरू झाले.
डिसेंबर 2018मध्ये मंजूरी मिळालेल्या या बाह्यवळण कामांपैकी दुसऱ्या टप्प्यामध्ये राजगुरुनगर व मंचर बायपाससाठी 216 कोटींची निविदा निघाली आहे. राजगुरुनगर बाह्यवळणासाठी भूसंपादन काही प्रमाणात अपूर्ण असून केंद्रीय कृषी संशोधन मंडळाच्या अधिकारात असलेली कांदा लसून संशोधन केंद्राची 1.22 हेक्टर जागेच्या संपादनासाठी माझा दोन वर्षापासूनचा पाठपुरावा अंतिम टप्यात आहे. या जागेच्या भूसंपादनाचे 8 कोटी रूपये भूसंपादन विभागाकडे जमा झाले आहेत. केंद्रीय कृषी संशोधन विभागाची अंतीम मंजूरी मिळविण्याचे माझे प्रयत्न सुरू असून या मंजूरीनंतर येथे पूलाचे काम हाती घेणे शक्य होईल.