झेडपीच्या सभेत दोन्ही काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्षाची चिन्हे

सातारा – विधानसभा निवडणुकीनंतर सातारा जिल्हा परिषदेची पहिलीच सभा शुक्रवारी (दि. 15) रोजी होत असून ही सभा वादळी होण्याची शक्‍यता आहे. संभाव्य महाशिवआघाडी आणि भाजपमध्ये राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षाचे परिणाम या सभेत होण्याची शक्‍यता असून कॉंग्रेस- राष्ट्रवादी विरुध्द भाजप असा संघर्ष पाहावयास मिळण्याची शक्‍यता असल्याने सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असून सध्या संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे अध्यक्षपद तर राष्ट्रवादीतच असलेले मात्र भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणारे वसंतराव मानकुमरे यांच्याकडे उपाध्यक्षपद आहे. महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे याही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेच नेतृत्व मानत आलेल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात वसंतराव मानकुमरे व वनिता गोरे या राष्ट्रवादीबरोबर राहणार की आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानून भाजपला साथ देणार, याचीच उत्सुकता आहे.
जिल्हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला.

सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र, गत काही वर्षांमध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपची लाट निर्माण झाली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही कॉंग्रेसच्या अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. माजी खासदार उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन्ही कॉंग्रेसचे दिग्गज फोडून भाजपमध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील लढती लक्षवेधी होवून भाजप जोरदार मुसंडी मारेल, अशी परिस्थिती होती. मात्र, शरद पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतल्याने भाजपचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वार्तावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीतील आरोप – प्रत्यारोपात निकालानंतर राज्यात निर्माण झालेल्या सत्ता संघर्षाची पडली. 25 वर्षे एकत्र राहिलेली युती तुटण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. या घडामोडीनंतर कॉंग्रेस- राष्ट्रवादी व शिवसेना अशी महाशिवआघाडी स्थापन करुन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची व्यूहरचना आखण्यात येत आहे. त्यामुळे वातावरण आणखीनच ढवळून निघाले आहे.

त्याचा परिणाम शुक्रवारी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सभेत होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. माजी खासदार उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांना मानणाऱ्या सदस्यांकडून सत्ताधारी राष्ट्रवादीला विविध मुद्यांवरुन धारेवर धरण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.