कराड उत्तरमधील लढत रंगतदार होण्याची चिन्हे

कधी काळी एकतर्फी निवडणूक होणाऱ्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आता मोठी “टसल’ पाहायला मिळणार आहे. आमदार बाळासाहेब पाटील त्यांनी गेली चार टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, यंदा त्यांच्यासमोर भाजपच्या मनोज घोरपडे यांचे कडवे आव्हान उभे राहण्याची शक्‍यता आहे. मात्र, कोणत्या पक्षात जायचे, हे अजून निश्‍चित न झाल्याने धैर्यशील कदमांचा पत्ता कट होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आमदार पाटील विरुद्ध घोरपडे अशी लढत रंगणार आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीने जो उमेदवार उभा केला, तो विजयी झाल्याचे आतपर्यंत चित्र होते.

सत्ता असतानादेखील जिल्ह्यात अपेक्षित कामे न झाल्याने विरोधी पक्षांनी बस्तान बसवायला सुरुवात केली. 2014 मध्ये कराड उत्तरमध्ये बहुरंगी निवडणूक झाली. भाजपने मित्रपक्ष स्वभिमानी शेतकरी संघटनेला ही जागा सोडली होती. मनोज घोरपडे या युवा नेत्याला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात 44 हजार मते घेतली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीही वेगवेगळी लढली. कॉंग्रेसच्या धैर्यशील कदमांना 58 हजार मते मिळाली तर आमदार बाळासाहेब पाटील यांना 78 हजार मते मिळून त्यांचा विजय झाला.

दरम्यानच्या काळात कॉंग्रेसवर नाराज असलेल्या धैर्यशील कदम यांनी खाजगी साखर कारखाना उभा केला. यामुळे आपण निवडून येऊ, असे त्यांना वाटत आहे. मात्र, त्यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात संपर्क ठेवला नाही. कारखान्याच्या कामगारांचे पगार थकवल्याने बऱ्याच जणांनी नोकऱ्या सोडल्या. ज्या लोकांनी ऊस दिला, त्यांना पूर्ण पैसे अजूनही मिळालेले नाहीत. त्यामुळे कदमांविषयी नाराजी आहे. त्यातच शिवसेनेत जायचे की भाजपमध्ये, हे कळेनासे झाल्याने त्यांचे कार्यकर्ते सैरभैर असून त्यांचा पत्ता जवळपास कट झाल्याचे बोलले जात आहे.

मनोज घोरपडेंनी काहीही करुन 2019 मध्ये विजय मिळवायचा या निर्धाराने अधिक जोमाने काम सुरू केले. सत्ता असेल तरच मतदारसंघात विकास होईल, यासाठी ते भाजपमध्ये गेले. कामाच्या जोरावर जिल्हा परिषदेत निवडून गेले. आमदार नसतानाही त्यांनी मागील पाच वर्षात मतदारसंघात कोट्यवधींचा निधी आणला. या विकासकामांच्या उद्‌घाटनाचा धडाका सुरू असून आ. बाळासाहेब पाटील यांना जोरदार टक्‍कर देण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here