दुबई – गेली अनेक दशके अफगाणिस्तानात सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष मिटण्याची चिन्हे आहेत. अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानी प्रतिनिधींमध्ये सध्या अमेरिकेच्या मध्यस्थीने चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांच्या उपस्थितीत कतारमध्ये ही चर्चा सुरू झाली.
अफगाण सरकार आणि तालिबान यांच्यात जर शांतता समझोता झाला तर अमेरिकेचे अफगाणिस्ताना -तील सैन्य पूर्णपणे मागे घेतले जाणार आहे. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष ट्रम्प इस्लामिक देशांमध्ये अनेक तडजोडी घडवून आणत असून त्यात त्यांना सध्या मोठ्या प्रमाणावर यश येत आहे.
अरब जग आणि इस्रायल यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे कामही ट्रम्प यांनी अलीकडेच केले असून त्यांनी आता अफगाण सरकार आणि तालिबान्यांमध्येही चर्चा घडवून आणली आहे.
कायमस्वरूपी शस्त्रसंधी, महिला आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण आणि हजारो तालिबानी गनिमांनी शस्त्रे खाली ठेवणे आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा अपेक्षित आहे. त्याच्या बदल्यात तालिबान्यांना अफगाण सरकारमध्ये सत्तेचा वाटा दिला जाण्याची शक्यता आहे.
अफगाण सरकारने या चर्चेसाठी आपल्या वतीने जे शिष्टमंडळ पाठवले आहे त्यात चार महिला प्रतिनिधींचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला. यावेळी या महिला प्रतिनिधींकडून महिलांना शिक्षण, रोजगाराचा हक्क तसेच राजकारणात भाग घेण्याचा अधिकार प्रदान करण्यात यावा असा आग्रह तालिबानकडे धरला जाणार आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार असताना महिलांना तेथे हे अधिकार नाकारले गेले होते.