देशातील करोना मृत्यूदरात लक्षणीय घट; आता 2.43 टक्‍क्‍यांवर

नवी दिल्ली – देशातील करोना मृत्यूदरात महिनाभरात लक्षणीय घट झाली आहे. तो दर 17 जूनला 3.36 टक्के इतका होता. आता तो 2.43 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. त्या आकडेवारीचा आधार घेत केंद्र सरकारने करोना संकटाचा मुकाबला देशाने प्रभावीपणे केल्याचे नमूद केले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जगात सर्वांत कमी करोना मृत्यूदर असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारतात प्रति 10 लाख लोकसंख्येमागे मृत्यूदर 20.4 आहे. जागतिक सरासरी मृत्यूदर 77 आहे.

काही देशांमध्ये तर प्रति 10 लाख लोकसंख्येमागे भारताच्या 21 ते 33 पट अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. भारतातील करोनाबाधितांचे प्रमाण अनेक देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. भारतात प्रति 10 लाख लोकसंख्येमागे 837 बाधितांची नोंद झाली आहे. देशातील पॉझिटिव्हिटी दर 8.07 टक्के इतका आहे. तो 5 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सलग सहाव्या दिवशी आढळले 30 हजारांहून अधिक बाधित
देशात सोमवार सकाळपासून 24 तासांत 37 हजार 148 नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे सलग सहाव्या दिवशी देशात 30 हजारांहून अधिक नव्या बाधितांची नोंद झाली. देशभरात एका दिवसात आणखी 587 बाधित दगावले.

देशात सध्या 4 लाखांहून अधिक सक्रिय बाधित आहेत. तर आतापर्यंत सुमारे 7 लाख 25 हजार बाधित करोनामुक्त झाले आहेत. करोना संसर्ग झालेले रुग्ण बरे होण्याचे देशातील प्रमाण 62.72 टक्के इतके आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.