आंबेगावात गव्हाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ

रांजणी – आंबेगाव तालुक्‍यात चालू वर्षी गव्हाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. खरे तर गव्हाच्या पिकासाठी पोषक हवामान असल्याने गहू उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चालू वर्षी रब्बी हंगामात शेतीला मुबलक पाणी असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी गहू पीक घेण्याकडे मोर्चा वळवला असून गव्हाला पोषक असे वातावरण असल्याने गहू उत्पादनात वाढ होईल असा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

यंदा कदाचित हा उच्चांक असेल
यंदा कांद्याचेही उत्पादन कमी आहे. कारण कांदा लागवड करण्यासाठी लागणारी रोपे अवकाळी पावसाने नष्ठ झाली. त्यामुळे कांदा उत्पादनातही भविष्यात घट येणार आहे. या सर्व बाबी ओळखून यंदा तालुक्‍यातील बहुतांश शेतकऱ्यांनी गहू पीक घेण्याला प्राधान्य दिले आहे. तालुक्‍यात सुमारे पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली असून गेल्या काही वर्षातील रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या गहू उत्पादनाचा कदाचित हा उच्चांक असेल.

यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिले. सप्टेबर-ऑक्‍टोबर महिन्यात अवकाळी पावसाने ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले. किंबहुना ऊस पीक नष्ट झाल्याने शेतात कोणते पीक घ्यावे, असा शेतकऱ्यांना प्रश्‍न पडला होता. यंदाच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे रब्बी हंगामात गहू पीक घेतले आहे. सध्या चांगल्या गव्हाला बाजारात प्रति क्‍विंटल 2 हजार 200 ते 2 हजार 500 असा बाजारभाव आहे.

त्यामुळे एकरी गव्हाचे उत्पादन चांगले मिळेल या भावनेतून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू पिकाला प्राधान्य दिले. सध्या गव्हाने ओंबी टाकली असून गव्हाचे दाने ओंबीमध्ये भरण्याच्या प्रक्रियेत आहेत. साधारणत: गव्हाला झड ही चांगली असल्याने एकरी 20 ते 25 क्‍विंटल गव्हाचे उत्पादन निघेल असा शेतकरी वर्गाचा अंदाज आहे.

गव्हाप्रमाणेच यंदा हरभऱ्याचे पीकही चांगले आल्याने गहू आणि हरभरा पिकाला रब्बी हंगामातील सुगीचे दिवस आहेत. कोबी, फ्लॉवर या पिकांना खरीप हंगामात बाजारभाव न मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचा पिकांवर केलेला खर्चही वसुल झाला नाही. त्यामुळे रब्बी हंगामात कोणते पीक घ्यावे असा शेतकऱ्यांना प्रश्‍न पडला होता. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी गव्हाचे पीक घेण्याचाच निर्णय घेतला.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.