गंध, चव न येणाऱ्या रुग्णांत लक्षणीय वाढ

वेळीच तपासणी न केल्यास संसर्ग वाढण्याची शक्‍यता

पिंपरी – करोनाचे ताप, सर्दी व खोकला अशी लक्षणे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने वास न येणे व तोंडाला चव नसणे ही देखील करोनाची लक्षणे सांगितली आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता अशा प्रकारची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामध्ये तीव्र लक्षणे नसतात, मात्र रुग्ण हा करोना वाहक असू शकतो, त्यामुळे करोनाचा आणखी धोका वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

शहरातील रुग्णसंख्येने 80 हजारांचा टप्पा पार केला आहे. करोना विषाणूने सर्वच जगाला हादरवून सोडले आहे. नव्याने आढळलेल्या या विषाणूबाबत कोणालाही जाण नव्हती. त्यामुळे प्राथमिक अभ्यासानुसार ताप, सर्दी व खोकला ही करोनाची लक्षणे सांगितली जात होती. यामुळे नागरिक आता आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नवनवीन प्रयोग करत आहेत.

शासनाकडून करोना रुग्ण शोधून काढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या सर्वेक्षणातही ताप, सर्दी व खोकला यांचीच विचारणा केली जाते. मात्र काही खासगी चिकित्सकांकडे अशा प्रकारे गंध व चव न येणाऱ्या रुग्णांनी तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. खासगी चिकित्सकांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे तपासणीसाठी येणाऱ्या अनेक नागरिकांमध्ये गंध व चव न येणे अशी लक्षणे असतात. त्या रुग्णांना तपासणीसाठी पालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविले असता, त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजेच आतापर्यंत ताप, सर्दी व खोकला, शिंका या लक्षणांना गृहीत धरून रुग्ण शोधण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून केले जात होते. त्यात आणखी दोन लक्षणांची भर पडली असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

वेळीच तपासणी करून घेणे आवश्‍यक
आतापर्यंत सर्दी, ताप व खोकला असल्यास रुग्ण स्वतःची तपासणी करून घेत होते. त्यामुळे अहवालानुसार ते स्वतः वेगळे होत व त्यामुळे जास्त संसर्ग पसरत नसे. मात्र आता चव व गंध याबाबत अनेकांना माहिती नाही. त्यामुळे ते अजाणतेपणाने इतर नागरिकांमध्ये मिसळतात. त्यामधून करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता जास्त आहे.

मला दोन ते तीन दिवस कोणत्याही पदार्थाची चव लागत नव्हती. मात्र, पहिल्यांदा मला हे समजलेच नाही. नंतर मी एका खासगी दवाखान्यात तपासणी केली तर त्यांनी मला करोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी सांगवी येथील दवाखान्यामध्ये करोनाची अँटिजेन चाचणी केली. त्यामध्ये माझा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
– कोविड रुग्ण 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.