नवी दिल्ली – जगासह देशावर आलेल्या करोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व व्यक्तींना पोस्टल मतदानाचा अधिकार आयोगाने दिला आहे. या निर्णयावर केंद्रीय निवडणूक आयोगाने आज अधिकृत नोटिफिकेशन काढून शिक्कामोर्तब केला आहे.
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे निवडणूक आयोगाचे मत आहे. याआधी पोस्टल मतदानासाठी 80 ही वयोमर्यादा होती. याशिवाय करोना पॉझिटिव्ह आणि होम क्वॉरंटाईन करण्यात आलेली व्यक्तींनाही पोस्टल मतदान करण्याचा अधिकार आयोगाने जाहीर केला आहे. या वर्षाच्या अखेरीस बिहारच्या निवडणुका अपेक्षित आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्त्वाची आहे.
दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी मात्र आयोगाच्या या निर्णयाला विरोध केला होता. मतदाराची खरी ओळख पटणं हा मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी महत्त्वाचा भाग आहे. आणि एका झटक्यात इतक्या मोठ्या गटाला यातून वगळल्याने गैरव्यवहार वाढू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. तसेच हा निर्णय घेताना आयोगाने राजकीय पक्षांची कुठलीच चर्चा न केल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता.