लंडन – ब्रिटनच्या राजघराण्यातील राजशिष्टाचाराचे अधिकार सोडून देण्याबाबतच्या करारावर प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेघन मर्केल यांनी आज स्वाक्षऱ्या केल्या. यामुळे या दोघांना यापुढे “हिज हायनेस’आणि “हर हायनेस’ असे औपचारिकतेने संबोधले जाणार नही. तसेच त्यांना त्यांच्या ब्रिटनच्या करदात्यांच्या निधीतून वाटाही दिला जाणार नाही. या कराराची अंमलबजावणी काही आठवड्यत येणाऱ्या वसंत ऋतूपासून करण्यत येणार आहे. हे दाम्पत्य यापुढे ब्रिटनच्या महाराणींचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाणार नाहीत, असे बकिंगहॅम राजवाड्याच्या प्रवक्त्याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
शाही कर्तव्यांपासून माघार…
हॅरी आणि मर्केल या जोडप्यास अधिकृत सैन्य नियुक्त्यांसह शाही कर्तव्यापासून माघार घ्यावी लागेल. फ्रोगमोर कॉटेजच्या नूतनीकरणासाठी ब्रिटनच्या करदात्यांचे 2.4 दशलक्ष पौंड परत देण्याचा या जोडप्याचा हेतू आहे. ब्रिटन आणि कॅनडा दरम्यान त्यांची विभगणी झाल्यामुळे फ्रोगमोर कॉटेज हे त्यांचे ब्रिटनमधील कुटुंबाचे घर राहील. भविष्यात या जोडप्यांसाठी कोण बिल देईल आणि सुरक्षा व्यवस्थेविषयी भाष्य करण्यास राजवाड्याने नकार दिला आहे
या करारावर अनेक महिने चर्चा झाली होती. आपला नातू आणि त्याच्या कुटुंबासाठी पुढे एक विधायक आणि पाठिंबा देणारा मार्ग होता, असे महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी म्हटले आहे. या कराराला नाईलाजाने आणि नाखुषीने त्यांनी तयारी दर्शवली असल्याचे बकिंगहॅमच्या सूत्रांनी म्हटले आहे. मात्र प्रिन्स हॅरी, मेघन आणि आर्ची माझ्या कुटुंबातील नेहमीच आवडणारे सदस्य असतील, असे 93 वर्षीय महाराणींच्या वैयक्तिक निवेदनात म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षात या दाम्पत्याला आलेल्या अडचणींबाबत आपल्याला माहिती आहे. अधिक स्वतंत्र आयुष्य जगण्याबाबतच्या त्यांच्या निर्णयाला आपला पाठिंबा असेल, असेही महाराणींनी म्हटले आहे. ब्रिटन आणि संपूर्ण राष्ट्रकुलासाठी नातू आणि नातसूनेने केलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभारही महाराणींनी मानले आहेत.