नवी दिल्ली (प्रतिनिधी) – देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लागू केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा कालावधी वाढणार असल्याचे संकेत दिलेत. सध्याचा कॉलडाउनचा कालावधी 14 एप्रिलपर्यंत आहे. मात्र हा कालावधी आणखी वाढविला जाणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, ‘देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या 5000च्या वर गेली असल्याने या स्थितीत लॉकडाऊन संपवून दैनंदिन जनजीवन सुरळीत करणे शक्य नाही.’ अशी माहिती प्रमुख राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी पुन्हा एकदा देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. त्या दिवशीच लॉकडाऊन वाढवायचा की संपवायचा यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.