नवी दिल्ली : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागील सूत्रधार गोल्डी ब्रार याचा सुगावा एफबीआयला लागल्याची महत्वपूर्ण माहिती मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गोल्डीला कॅलिफोर्नियामध्ये ट्रॅक करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी समोर येत आहे.
दरम्यान, अमेरिकेत एफबीआयने गँगस्टर गोल्डी ब्रारचा शोध सुरु केला आहे. एफबीआय लवकरच गोल्डी ब्रारला अटक करणार असल्याची माहिती मिळत आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने हत्येची जबाबदारी घेतली होती. गोल्डी ब्रार गेल्या अनेक वर्षांपासून कॅनडात बसून अनेक गंभीर गुन्ह्यांची सूत्र हलवत होता. कॅनडातूनच तो भारतात खून आणि तस्करीचे काम करत होता. त्यासाठी त्याला लाखो रुपये मिळत असल्याचीही माहिती समोर आली होती.
परदेशात बसूनच सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याकाडांच कट गोल्डी ब्रारने रचल्याचे म्हटले जात आहे. त्यानंच आपल्या गुंडांकडून सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर तो अमेरिकेत पळून गेला. मुसेवालाच्या हत्येसंदर्भात गोल्डी ब्रारच्या वतीनं एक व्हिडीओ जारी करण्यात आला होता, ज्यामध्ये त्यानं मुसेवाला यांच्या हत्याकांडाचा कट रचल्याचं कबुल करत हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती.
काही दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांनी ल्डी ब्रारविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी केली होती. गोल्डी ब्रार सध्या कॅनडात लपून बसला असून तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रिय सदस्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीनं एका कथित फेसबुक पोस्टद्वारे सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.