संततीप्रतिबंधक गोळ्यांचे साईड-इफेक्ट्स

गर्भनिरोधक खायच्या गोळ्या (ओरल पिल्स) बाजारात सहजपणे उपलब्ध व्हायला लागल्यामुळे प्लानिंगशिवाय गर्भधारणा, गर्भपात या घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे. खासकरून ईसीपीमुळे (इमर्जन्सी कॉंट्‍रासेप्टिव्ह पिल्स) सुनियोजित आईपणाचं (प्लान्ड मदरहूड) स्वातंत्र्य स्त्रीला मिळालं. गरज पडल्यास कधीही प्रिस्क्रीप्शनशिवाय या गोळ्या ताबडतोब उपलब्ध होतात. ही झाली ओरल पिल्सची सकारात्मक बाजू. कुठल्याही गोष्टीची जशी चांगली बाजू असते, तशी वाईटही असते.

डॉक्‍टरांच्या सल्ल्‌याशिवाय घेतल्या गेलेल्या ओरल पिल्सचे दुष्परिणाम भयंकर आहेत. अनेक सर्वेक्षणांतून समोर आलेल्या गोष्टी असं सांगतात की, ईसीपी कुठल्याही केमिस्टमध्ये डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) सहज उपलब्ध होत असल्यामुळे (ओव्हर-द-काउंटर) कमी वयाच्या तरुण-तरुणींमध्ये असुरक्षित शरीरसंबंधांचं प्रमाण वाढत आहे.

अजाणतेपणामुळे सेक्‍सच्या आहारी गेलेल्या तरुणाईला गुप्तरोगांची लागण होते. एका सर्वेक्षणातून असं स्पष्ट झालंय की, गेल्या तीन वर्षाच्या आत ईसीपीची विक्री कंडोमच्या तुलनेत वाढली आहे.

या सर्वेक्षणावर स्त्रीरोगतज्ज्ञ (गायनॅकोलॉजिस्ट) आणि कामविज्ञान शास्त्रज्ञ (सेक्‍सोलॉजिट) यांनी चिंता व्यक्ती केली आहे.

काय आहेत ईसीपी?
असुरक्षित शरीरसंबंधाच्या वेळी चुकून गर्भधारणा होण्याची शक्‍यता जास्त असते. अशा वेळी तसंच अनियोजित गर्भधारणा रोखण्यासाठी ईसीपीचा उपयोग केला जातो. या ईसीपीमध्ये संप्रेरकं (हार्मोन्स) असतात. गोळ्यांमध्ये इस्ट्‍रोजन आणि प्रोजेस्ट्‍रॉन ही संप्रेरकं असतात. ही संप्रेरकं नको असलेली गर्भधारणा रोखतात. मात्र या गोळ्या संबंधांनंतर 12 ते 72 तासांच्या आत घेतल्यास गर्भधारणेची शक्‍यता 35 टक्क्‌यांनी कमी होते. तसंच संबंधांनंतर 8 ते 12 तासांच्या आता घेतल्यास गोळ्यांचा परिणाम हा फक्त आणि फक्त 5 टक्के शिल्लक राहतो.

किरकोळ दुष्परिणाम
या गोळयांमध्ये स्त्री संप्रेरकांची (फिमेल हार्मोन्स) टक्केवारी जास्त असते. त्यामुळे या गोळ्या घेतल्यानंतर मासिक पाळी तारखेपेक्षा लवकर येते किंवा पुढे ढकलली जाते. मासिकपाळीच्या दरम्यान प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्रव होतो. तसंच थकवा येणं, डोकंदुखी, घाबरल्यासारखं होणं, स्तनांमध्ये दुखणं याही समस्या जाणवतात. काही स्त्रियांना उचक्‍या लागणं, उलटया होणं हेही त्रास होतात. या गोळ्या घेतल्यानंतर जास्त करून स्त्रियांची मासिक पाळी तारखेपेक्षा आठवडाभर आधी येते. तसंच ईसीपी घेतल्यानंतर तीन आठवडयांच्या आत मासिक पाळी न आल्यास स्त्रीला दिवस जाऊ शकतात.

नियमित घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक खायच्या गोळया:
नको असलेलं आईपण टाळण्यासाठी गर्भनिरोधक खायच्या गोळ्या नियमित घेणा-याही स्त्रियांची संख्या जास्त आहे. या गोळ्या सुरक्षित आहेत, यावर त्यांचा विश्‍वास असतो. ईसीपीच्या तुलनेत गर्भनिरोधक खायच्या गोळया या अधिक सुरक्षित असतात. मात्र या गोळ्या घेताना तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. “माझी मैत्रीण ही गोळी घेते म्हणून मीही घेते,’ किंवा “माझी काकी ही गोळी घ्यायची म्हणून मीही गोळी घेते’, अशा एकमेकींच्या अनुभवावरून जाहिरातींना भुलून गर्भनिरोधक खायच्या गोळ्या घेणाऱ्यांच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होत आहे. मात्र हे कधी कधी जीवावर बेतू शकतं. जसं की स्त्रियांना यकृताचे आजार असतील, मायग्रेनची समस्या असेल, रक्तदाबाचा त्रास असेल, मधुमेहाचा त्रास किंवा इतर कोणत्याही आजारपणाचं औषध चालू असेल.. अशा परिस्थितीत जर नियमित स्वरूपात गर्भनिरोधक खायच्या गोळ्या घेणं सुरू केलं तर ते जीवावर बेतू शकतं.

गंभीर दुष्परिणाम
ईसीपी गोळया वारंवार घेणाऱ्या प्रत्येकीला असुरक्षित शरीरसंबंधातून गुप्तरोग, एड्‌ससारख्या रोगांची लागण चटकन होते. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.

सध्या या गोळ्या डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळत असल्यामुळे कमी वयाच्या तरुण-तरुणी लवकर सेक्‍शुअली ऍक्‍टिव्ह होतात. ईसीपी गोळ्या नियमित घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांप्रमाणे घेण्याची त्यांना सवय लागते. काही औषधं अशी असतात की, जी ईसीपीच्या परिणामांची तीव्रता कमी करतात. अशा गोळ्यांमुळे एकतर ऍलर्जी तरी होते किंवा गरोदर राहण्याची शक्‍यता तरी वाढते.

या गोळ्यांमुळे “इक्‍टोपीक प्रेग्नन्सी’ म्हणजे गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा होते. यात गर्भाची वाढ फॅलोपिअन टयुबमध्ये होते. अशा स्थितीत गर्भपात करणं हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो. नाहीतर फॅलोपिअन टयुब फुटून स्त्रीच्या जीवावर बेतू शकतं.

मनाने निर्णय घेऊ नका!
तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय नियमित स्वरूपात गर्भनिरोधक खायच्या गोळ्या तसंच ईसीपी घेणं आणि मध्येच खाणं सुरू करणं म्हणजे आपलं शरीर आणि संप्रेरकांशी जणू खेळणंच आहे. वेगवेगळ्या गोळया या निरनिराळया रसायनांच्या संयोगाने तयार केल्या जातात. प्रत्येकाची शरीर प्रकृती ही निराळी असते. मात्र ईसीपी पिल्स तसंच नियमित स्वरूपात घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या या डॉक्‍टरांच्या सल्ल्‌याने घेतल्यास डॉक्‍टर नीट तपासून शरीररचनेनुसार देतात.

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने वजन वाढतं, हार्मोन्सची संख्या बिघडते, असं वाटतं. या गोळयांमुळे कॅन्सर होतो, अशीही काही जणींची समजूत असते. पण आताच्या गर्भनिरोधक गोळ्या या पूर्वीपेक्षा हेवी डोसच्या नसतात. त्यामुळे अशा शंकाकुशंका मनात येण्याचं कारण नाही. ईसीपी या प्रकारात मोडणाऱ्या गोळ्यांविषयी फारसी माहिती नसते.
अनेकींना ईसीपी या प्रकारात मोडणाऱ्या गोळ्या या नियमित स्वरूपातील गर्भनिरोधक खायच्या गोळयांप्रमाणे वाटतात. नेमका हाच गैरसमज जीवावर बेततो.

संतति प्रतिबंधक गोळ्यांचे इतर काही फायदे आहेत. पाळी नियमित होते. पाळी सुरू होण्याआधीच्या तक्रारी आणि दुखणं कमी होतं. पाळीच्या दिवसात अंगावर कमी जाणं, कमी रक्तस्त्रावामुळे पंडुरोग होण्याची शक्‍यता घटते. गर्भ असाधारण ठिकाणी रुजणं, स्तनांत स्त्रीबीज कोषात गाठी होणं, गर्भशयाच्या आतल्या अस्तराचा कर्करोग, ओटीपोटात जंतू संसर्ग होणं इत्यादी अनेक रोगांपासून संततिप्रतिबंधक गोळया स्त्रियांचा बचाव करतात. संतति-प्रतिबंधक गोळयांमुळे वजन वाढण्याची शक्‍यता नगण्य असते. म्हणजेच पूर्वीचे गैरसमज आता निकालात निघाले आहेत. कॅन्सर व्हायची भीती नसते. गोळया थांबवल्यास गर्भधारणा व्हायची क्षमता परत प्राप्त होते. तेव्हा वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य त्या संततिप्रतिबंध गोळया जरुर घ्यायला हव्यात.

गर्भनिरोधक गोळ्या (किंवा संप्रेरकांचा अंतर्भाव असलेली संततीनियमनाची इतर कोणतीही साधने म्हणजे निरोगी आणि तरुण स्त्रियांसाठी गर्भारपण टाळण्यासाठीचा सर्वाधिक सोयीस्कर व सुरक्षित मार्ग असतो. यातील काही स्त्रियांना मात्र हृदयविकार, हार्टअटॅक, स्ट्रोक्‍स आणि रक्तात गुठळ्या होणे अशाप्रकारच्या गंभीर समस्यांचा धोका असू शकतो. त्यामुळे संततीनियमनासाठी डॉक्‍टरांच्या सल्ल्‌याने, त्यांनी सांगितलेली पद्धत वापरणेच योग्य. स्वत:हून अशाप्रकारच्या उपाययोजना करणे कोणत्याही परिस्थितीत टाळायलाच हवे!

काय आहेत आणखी धोके?
गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्यास खालील स्थितींमध्ये हृदयविकार व अधिक गुंतागुंतीची लागण होण्याची शक्‍यता अधिक असते.
वय 40 वर्षाहून जास्त असल्यास.
रक्‍तदाब, मधुमेह, हाय कोलेस्टेरॉलचा त्रास असल्यास.
धूम्रपान करत असल्यास.
यापूर्वी स्ट्रोक, हार्टअटॅक किंवा रक्तात गुठळी झाल्याची घटना घडली असल्यास.
मायग्रेन विथ ऑराचा त्रास असल्यास.

गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना हृदयविकाराचा धोका कमी कसा करता येईल?
वर दिलेल्या प्रकारांपैकी हृदयविकाराचा धोका वाढविणारी कोणतीही स्थिती लागू होत असली तरीही संततीनियमनाची साधने वापरू शकता. त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या डॉक्‍टरांजवळ आपल्या शंका बोलून दाखवा. तुम्हाला दिल्या जाणाऱ्या संततीनियमनाच्या प्रत्येक साधनाचे फायदे-तोटे आजमावण्यात ते तुम्हाला मदत करतील.

संशोधनातून असे दिसून आले आहे की, उच्च रक्तदाब आणि मधूमेह यांसारख्या समस्या असलेल्या स्त्रियांचे हे आजार जोवर नियंत्रणात असतील, तोवर त्या सुरक्षितपणे गर्भनिरोधक गोळ्या घेऊ शकतात. रक्तात गुठळी होणे, स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा त्रास यापूर्वी कधीही झाला असेल, तर इस्ट्रोजेनयुक्त गर्भनिरोधके वापरता कामा नयेत. त्याविषयी डॉक्‍टरांशी बोला. जन्मजात हृदयविकार असलेल्या स्त्रिया संतती नियमनाची बहुतांश साधने वापरू शकतात. वय कितीही असो, गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्यास डॉक्‍टरांशी बोलून, संपूर्ण माहितीनिशीच आपला निर्णय घेणे आवश्‍यक!

डॉक्‍टरांच्या सल्ल्‌याशिवाय घेतलेल्या या गर्भनिरोधक खायच्या गोळयांचे शरीरावर होणारे परिणाम वाईट असतात. जसं की, मासिक पाळीच्या वेळी होणारे त्रास, मासिकपाळी दरम्यान अतिरक्तस्रव होणं, संप्रेरकांमुळे होणारे बदल हे परिणाम महत्त्वाचे आहेत.

जन्मनियंत्रण ही केवळ महिलांची जबाबदारी नाही, पुरुषांना ही जन्मनियंत्रण करण्याची माध्यमे उपलब्ध आहेत. जन्मनियंत्रणाचा विचार करताना स्त्रिया बरेचदा गोळ्या वापरतात वा पुरुष संभोगाच्या वेळी कॉन्डोमचा वापर करतात, अर्थातच गर्भावस्था टाळण्याचे इतरही अनेक मार्ग उपलब्ध आहेत. स्त्री आणि पुरुष अशा दोघांसाठीही उपलब्ध असलेल्या जन्मनियंत्रणाबाबत माहिती देतात.

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे हृदयविकाराचा धोका का वाढतो?
नावाप्रमाणेच इस्ट्रोजन आणि प्रेजेस्टिन अशी संप्रेरके ही या गोळ्यांतील प्रमुख घटक असतात. ही संप्रेरके हृदयाला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकतात. उदाहरणार्थ : त्यांच्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल, तर आपला रक्‍तदाब दर सहा महिन्यांतून एकदा तपासून पाहण्याची काळजी घ्यायला हवी व तो योग्य पातळीवर राहील यासाठी प्रयत्न करायला हवेत. आधीच उच्च रक्‍तदाबाचा त्रास असेल, तर शरीराला अधिक चांगल्या प्रकारे लागू होऊ शकेल, अशी संततीनियमनाची दुसरी एखादी अधिक सुरक्षित पद्धत आहे का, याबद्दल आपल्या डॉक्‍टरांशी चर्चा करा.

गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या स्त्रियांच्या रक्तातील हृदयविकाराला कारणीभूत ठरणाऱ्या स्निग्धांशांची पातळी बदलत असल्याचे दिसून येऊ शकेल.

उदाहरणार्थ : शरीरातील गुड कोलेस्टेरॉलची पातळी खाली गेलेली दिसेल; त्याचवेळी ट्रायग्लिसराइड्‌स आणि बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढलेली दिसेल. यामुळे हळूहळू धमन्यांच्या आतल्या बाजूस प्लाक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चरबीयुक्त पदार्थाचा थर साठत जाईल. कालांतराने या प्लाकमुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होईल किंवा त्यात अडथळा निर्माण होईल व त्यातून हार्टऍटॅक किंवा अन्जायना (छातीत दुखण्याचा एक प्रकार) यांसारखी समस्या उद्भवू शकेल. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये असलेल्या इस्ट्रोजनमुळे रक्तात गुठळ्या होण्याचा धोकाही वाढू शकतो!

तात्पुरता अडथळा पद्धती :
कॉन्डोम्स लॅटेक्‍स किंवा पॉलियुरेथिनने बनवलेले कॉन्डोम्स हे गर्भावस्था आणि संभोगाद्वारे पसरणारे रोग टाळण्यातील सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे गर्भनिरोधक आहेत. हे कॉन्डोम्स औषधांच्या दुकानात उपलब्ध असून सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्येही ते मोठ्या प्रमाणावर मिळतात. ते स्वस्त असतात आणि त्यांचे साइड इफेक्‍ट नाहीत. ते बाहेर नेण्यास सोपे, वापरण्यास आणि विल्हेवाट लावण्यात सुलभ असतात. जोडीदारांमधील कोणत्याही संसर्गाच्या लागणीस टाळण्यासाठी ते परिणामकारक आहेत.

डायफ्राम
स्त्रिया डायफ्राम या इंट्राव्हजायनल उपकरणाचा वापर करू शकतात, ज्याचा आकार घुमटासारखा असतो आणि ते सिलिकॉनचे बनवलेले असतात. ते योनीमार्गात सरकवता येतात आणि सुरतक्रियेपूर्वी तीन तास आणि नंतर सहा तास ठेवावे लागतात. त्यातील दोष म्हणजे ऍलर्जी येणे आणि लैंगिकदृष्ट्या पसरणाऱ्या आजारांचे संभाव्य संसर्ग हे आहेत. कोणत्या साइज आणि फिटिंग जाणून घेण्यासाठी डॉक्‍टरकडून पेल्व्हिक तपासणी करावी लागते. या गोष्टी मुलाच्या जन्मानंतर बदलू शकतात.

हार्मोनल पद्धती :
जन्मनियंत्रण गोळ्या यामुळे 35 टक्के प्रकरणांमध्ये गर्भावस्था टाळतात. तुम्ही तुमच्या डॉक्‍टरच्या सल्ल्यानुसार रोज एक गोळी घेतल्यास 75 टक्के संरक्षण त्यातून मिळू शकते. तथापि, त्यामुळे तुम्हाला संभोगाद्वारे प्रसारित होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळत नाही. तसेच तुम्हाला त्या प्रिस्क्रिप्शननेच घ्याव्या लागतील.

त्वचेवर पट्टे (छोटे, पातळ, चिकट पट्टे) यांच्यातून इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन तुमच्या यंत्रणेत स्थिरपणे सोडले जातात आणि हे हार्मोन्स गर्भावस्था टाळण्यात मदत करतात. हे पट्टे वापरण्यास सोपे आहेत आणि सामान्यत: एकाच वेळी बदलावे लागतात.

व्हजायनल रिंग्ज (लवचिक, हलक्‍या वजनाचे उपकरण जे स्त्रियांच्या योनीत सरकवले जाते.) यात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचा समावेश असतो ज्यातून गर्भाशयात बीज कायम राहते आणि गर्भाशयाच्या भिंती मजबूत होऊन तेथे शुक्राणूंच्या प्रवेशाला प्रतिबंध केला जातो.

हार्मोन पॅचेसमुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन गर्भावस्था टाळण्यासाठी त्वचेत सोडले जातात. ते सुरक्षित, स्वस्त आणि वापरण्यास सोपे आहेत. एकावेळी एक पॅच सुमारे तीन आठवडे आणि चौथा किंवा शेवटचा आठवडा पॅच न वापरता घालवायचा असतो. चौथ्या आठवड्यादरम्यान मासिक पाळी येते. हा पॅच नितंबावर, ओटीपोटावर किंवा तुमच्या हातावर लावता येतो.

दीर्घकालीन अडथळा पद्धती
इंट्रायुटेरिन डिव्हाइस (आययूडी) ज्याची शिफारस डॉक्‍टरांकडून केली जाते आणि ते त्यांच्याकडूनच बसवले जाते. त्याचे दोन प्रकार आहेत हार्मोनल आणि तांबी. ते अनुक्रमे पाच ते दहा महिने तुमच्या योनीमध्ये राहू शकते, अर्थात सुरतक्रियेद्वारे पसरणाऱ्या संसर्गावर ते संरक्षण देत नाहीत.

नसबंदी :
हा प्रकार स्त्री आणि पुरुष अशा दोघांसाठी असून पुरुषांसाठीच्या या पद्धतीला व्हॅसेक्‍टोमी म्हटले जाते. त्यात तुमचे शुक्राणू वाहून नेणाऱ्या टयूब्ज बांधून कापल्या जातात. तुमचे डॉक्‍टर नसबंदीच्या सर्जिकल आणि बिगर सर्जिकल पद्धतींमधून निवडण्यास सांगू शकतात.

– डॉ. मेधा क्षीरसागर

Leave A Reply

Your email address will not be published.