सातारा – येथील जिजाऊ फाउंडेशनच्या संस्थापिका व नगरसेविका सिद्धी रवींद्र पवार यांची सातारा पालिकेत भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी ही घोषणा केली.
विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सुरू झालेल्या संघटनात्मक बदलांनुसार ही निवड करण्यात आली आहे. जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला वर्गात असणारा जनसंपर्क आणि सातारा तालुक्यात पक्ष संघटनेत दिलेले योगदान यामुळे सिद्धी पवार यांना सातारा पालिकेत गटनेतेपदाची संधी देण्यात आली आहे.
सिद्धी पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्ष युवती मोर्चा जिल्हाध्यक्ष, महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष अशा पदांवर काम केले आहे. त्या भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. पालिका सभागृहात आक्रमक नगरसेविका अशी ओळख असलेल्या सिद्धी पवार यांनी गेल्या अडीच वर्षात सभागृहात 37 विषयांवर आवाज उठवून कामे मार्गी लावली आहेत. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम त्या करत आहेत.