नागरिकांसह पालिका पदाधिकाऱ्यांमधून तीव्र नाराजी
म्हसवड – राज्यभरासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हसवड येथील श्री सिद्धनाथ रथयात्रा 27 रोजी होणार आहे. या यात्रेनिमित्त नुकतीच सिद्धनाथ मंदिरात यात्र समितीची बैठक पार पडली. मात्र या बैठकीला पालिकेच्या मुख्याधिकारी गैरहजर राहिल्यामुळे नागरिकांसह पालिका पदाधिकाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
यावेळी प्रांत अधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार बी. एस. माने, मुख्य मानकरी अजितराव राजेमाने, जयराज राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सालकरी दिलीप किर्तने, नगराध्यक्ष तुषार वीरकर, बाळासाहेब राजेमाने, धनाजी माने, युवराज सुर्यवंशी, आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, बीडीओ जी. डी. शेलार, एपीआय गणेश वाघमोडे, उपअभियंता आर. एस. इंगळे, प्रा. विश्वभंर बाबर, नगरसेवक धनाजी माने, नगरसेवक अकिल काझी, नगरसेवक विकास गोंजारी आदी मानकरी व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी यात्रा काळात कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार बाई माने यांनी दिला आहे. यावेळी पोलीस स्टेशन, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, पाणीपुरवठा विभाग, वीज पारेषण विभाग, सार्वजनिक बांधकाम, जिल्हापरिषद विभाग रथ मानकरी, ग्रामस्थ यांनी यात्रेसाठी नियोजन केले.
म्हसवड नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा टॅंकरद्वारे करण्यात येणार आहे. यात्रा पटांगणात नळ कनेक्शन देण्यात येणार आहेत.
वीजेच्या तारांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच यात्रा काळात दहिवडी, पळशी, माळशिरस वीज पुरवठा केंद्रातून ऐनवेळी वीज पुरवठा करण्यात येणार आहे. यात्रा काळात चोवीस तास वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे वीज मंडळाच्या अधिकारी यांनी सांगितले. तसेच शहराच्या बाहेर पार्किंग व्यवस्था करण्यात येणार असून यात्रेच्या मुख्य दिवशी शहरात वाहने सोडली जाणार नाहीत.
पोलीस स्टेशनतर्फे टेहाळणी टॉवर उभारण्यात येणार असून 150 जादा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत, जादा 50 महिला पोलीस कर्मचारी मागणी म्हसवड पोलिसांनी केली आहे.
स्वच्छता विभागाकडून गटारे, रस्ता रोज सफाई करण्यात येणार आहे, शहरात फॉगींग करण्यात येत आहे. फरत्या शौचालयाची सोय केली आहे. म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्राने शहरात तीन आरोग्य पथके तयार करण्यात येणार आहेत. चार ऍम्बुलन्स तयार ठेवण्यात येणार आहेत. एक यात्रा पटांगणात एक ठेवण्यात येणार आहे. रस्त्यावर साईडपट्ट्या त्वरित भरुन घेण्याचे आदेश यावेळी तहसीलदार यांनी दिले.