Money Laundering | कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने 300 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या आणि एजंट म्हणून काम करणाऱ्या विविध लोकांच्या नावावर या मालमत्तांची नोंद आहे.
मैसुरू शहर विकास प्राधिकरणाच्या (मुडा) जमीन वाटपात घोटाळा झाला. त्याचा लाभ सिद्धरामय्या यांच्या पत्नी आणि इतर निकटवर्तीयांना मिळाल्याचा आरोप आहे. त्यावरून ईडीने मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) सिद्धरामय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
सिद्धरामय्या यांच्यावर म्हैसूरमधील लोकायुक्त पोलिसांकडे अनेक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. म्हैसूर नागरी विकास प्राधिकरणाने (MUDA) सुरुवातीला तीन एकर आणि 16 गुंठे जमीन 3,24,700 रुपयांना खरेदी केली होती. मात्र या पॉश क्षेत्रातील 14 भुखंडाची किंमत 56 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
निधीचा बेकायदेशीररित्या वापर
या गैरप्रकारात तत्कालीन मुडाचे आयुक्त डीबी नटेश यांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही तपासात समोर आले आहे. या अधिकाऱ्यांनी मालमत्ता, रोख रक्कम आणि इतर साधनांच्या रूपाने बेकायदेशीर नफा मिळवल्याचा आरोप आहे. ईडीने सांगितले की, या बेकायदेशीर निधीचा वापर सहकारी संस्थांमार्फत मालमत्ता आणि आलिशान वाहने खरेदी करण्यासाठी केला गेला.
या मालमत्तांची नोंद माजी मुडा आयुक्त जीटी दिनेश कुमार यांच्या नातेवाईकांच्या नावावर करण्यात आली होती. या प्रकरणात आणखी अनेक खुलासे होण्याची शक्यताही अंमलबजावणी संचालनालयाने दिली आहे. सध्या जप्त केलेल्या मालमत्ता आणि बेकायदा निधीचा स्रोत तपासला जात आहे.
हेही वाचा: