बंगळुरू : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्या समर्थनार्थ युवक कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) भडकले. डीके, डीके ओरडणारे कोण आहेत, असा संतप्त सवाल त्यांनी केला. कर्नाटकमधील सत्ताधारी कॉंग्रेसने मंगळवारी केंद्र सरकारच्या जी राम जी कायद्याच्या निषेधासाठी निदर्शने केली. त्यामध्ये सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि शिवकुमार हेही सहभागी झाले. निदर्शनांवेळी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. Siddaramaiah भाषणाची वेळ आल्यावर सिद्धरामय्या त्यांच्या खुर्चीवरून उठले. त्यावेळी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डीके, डीके अशा घोषणा देणे सुरू केले. भाषणासाठी सिद्धरामय्या सज्ज झाल्यावर घोषणांचा सूर आणखीच वाढला. त्यामुळे संतापलेल्या सिद्धरामय्या यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याची सूचना केली. मात्र, कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरूच राहिल्या. सिद्धरामय्या यांच्या भाषणात अडथळे न आणण्याचे आवाहन करण्यासाठी त्यामुळे इतरांनाही पुढे यावे लागले. कर्नाटक कॉंग्रेसमध्ये नेतृत्वावरून सुप्त संघर्ष सुरू असल्याचे याआधीच समोर आले. त्यातून मुख्यमंत्रिपदावरून सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात रस्सीखेच असल्याचे दडून राहिलेले नाही. त्यांच्या समर्थकांकडून आपापल्या नेत्यांचा आग्रह धरला जात आहे. त्याचेच प्रतिबिंब निदर्शनांवेळी उमटल्याचे मानले जात आहे. हे पण वाचा : नवीन नियमावरून देशभरात गदारोळ; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका