सिद्धरामय्या, गुंडूराव यांच्या राजीनाम्यांमुळे कर्नाटक कॉंग्रेसपुढे पेच

बंगळूर : कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीत पीछेहाट झाल्याने कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी पदांचे राजीनामे दिले. त्यामुळे कर्नाटक कॉंग्रेसपुढे नेतृत्वाचा पेच उभा राहण्याची शक्‍यता आहे. अर्थात, कॉंग्रेस श्रेष्ठी त्यांचे राजीनामे स्वीकारणार की फेटाळणार यावरही बरेच काही अवलंबून आहे.

कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल कॉंग्रेसच्या दृष्टीने मोठा हादरा ठरला. कॉंग्रेसला केवळ 2 जागांवर विजय मिळवता आला. पोटनिवडणुकीला सामोऱ्या गेलेल्या जागांपैकी 12 जागा आधी कॉंग्रेसकडे होत्या. त्या पोटनिवडणुकीत 12 जागा खिशात घालत भाजप सरकारने बहुमताचा आकडा पार केला.

खरेतर, पोटनिवडणुकीत कॉंग्रेसची कामगिरी चांगली होईल आणि कर्नाटकात सत्ता परिवर्तन घडेल, असा विश्‍वास त्या पक्षाच्या नेत्यांकडून बोलून दाखवला जात होता. मात्र, पोटनिवडणुकीमुळे भाजपची बाजू आणखी भक्कम झाली. त्यामुळे निकाल जाहीर होताच पीछेहाटीची नैतिक जबाबदारी स्वीकारत सिद्धरामय्या आणि गुंडूराव यांनी पदांचे राजीनामे दिले. त्याबाबत कॉंग्रेस श्रेष्ठी काय निर्णय घेणार याविषयी उत्सुकता आहे. सिद्धरामय्या आणि गुंडूराव यांचे राजीनामे स्वीकारण्यात आल्यास नव्या निवडींसाठी काही कालावधी लागण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.