संगमनेर – सीड मदर राहिबाई पोपेरे यांच्या अनोख्या कार्याची यशोगाथा “बीजमाता’ या शीर्षकाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील प्रथम वर्ष मराठी विषयाच्या “उत्कर्षवाटा’ पुस्तकात समाविष्ट केली आहे.
अक्षरा चोरमारे यांनी लिहिलेला लेख अभ्यासक्रमात संपादीत करण्यात आला आहे. राहिबाई पोपेरे यांनी पारंपरिक बियाण्यांची बॅंक उभारून शिक्षणाशिवाय कतृत्त्ववान होता येते, हा अण्णा भाऊ साठेंचा वारसा पुढे नेला. लौकिकार्थाने निरक्षर असणाऱ्या राहिबाई यांनी पारंपरिक बियाण्यांची बॅंक उभारली. ज्येष्ठ शस्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा सीड मदर असा उल्लेख केल्याने त्या सातासमुद्रापार माहीत झाल्या.
8 मार्च 2018 रोजी महिलादिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नारीशक्ती पुरस्कार देऊन त्यांना गौरविले, तर बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला आहे. पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे डॉ. शिरीष लांडगे, डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. राजेंद्र सांगळे यांनी हे पुस्तक संपादित केले आहे.