बनावट नोटा छापणाऱ्या बहिण-भावाला अटक

यू-ट्यूबवरील व्हिडिओ पाहून घरच्या घरी छापल्या नोटा

पिंपरी (प्रतिनिधी) – बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या बहिण भावाला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून शंभर रूपये दराच्या 34 नोटा हस्तगत केल्या. यु ट्यूबवरील व्हिडीओ त्यांनी बनावट नोटा छापल्याचे उघडकीस आले आहे. भोसरी येथील भाजी मंडई मध्ये नोटा खपवण्याचा प्रयत्न करताना हा प्रकार उघडकीस आला.

सुनीता प्रदीप रॉय (वय 22), दत्ता प्रदीप रॉय (वय 18, दोघे रा. घोटावडे, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनीता आणि दत्ता हे दोघेजण यु ट्यूबवरील व्हिडीओ पाहून घरातच नकली नोटा तयार करत होते. त्यासाठी त्यांनी प्रिंटर आणि कागद जमा केला होता. 100 रुपये दराच्या नोटा छापण्याचा सपाटा या दोघा भाऊ-बहिणीने लावला होता.

मंगळवारी (दि. 15) दुपारी पाच वाजताच्या सुमारास भोसरी चौकीसमोर असलेल्या भाजी मंडईमध्ये सुनीता आणि दत्ता त्यांनी छापलेल्या नकली नोटा भाजी खरेदी करण्यासाठी वापरत होते. दोघांनी भाजी खरेदी करून त्या नकली नोटा दोघांनी भाजी विक्रेत्याला दिल्या. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी सुनीता आणि दत्ता यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी करत पोलिसांनी 100 रुपये दाराच्या 34 नोटा, दोन एच पी कंपनीचे प्रिंटर, कागदी रिम आणि सुट्टे कागद असा एकूण 34 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांना पुढील कारवाईसाठी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.