बारामती : बारामती शहर व तालुक्यात एका दिवसात पाच रुग्ण सापडल्याने बारामतीच्या बाजारपेठेतील सर्व दुकाने पाच वाजता बंद करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. त्यानुसार शहरातील व्यापाऱ्यांनी पाच वाजता शटर डाऊन केले.
बारामती शहर व तालुक्यात शनिवारी (दि. 4) 5 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे बारामतीत कोरोना संक्रमितांचा वाढता आलेख धोकादायक ठरत असल्याने शहरात शासनाच्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार बारामती शहरातील सर्व दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आला.
सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असलेली दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू ठेवावी अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, शहरातील दुकानदारांनी पाच वाजता दुकाने बंद केली. पहिला दिवस असल्यामुळे काही दुकानात साडेपाच वाजेपर्यंत गर्दी दिसून आली. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर बारामती शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आली होती. त्यामुळे करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन दुकानांचे वेळेत बदल करण्यात आला. त्याची अंमलबजावणी सोमवार (दि. 6) पासून शहरातील दुकानदारांनी केली.