Shubhangi Gokhale | Ganesh Utsav : गणेशोत्सवाला केवळ दोन महिने शिल्लक असून आतापासूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपली तयारी सुरू केली आहे. यावर्षी ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरू होत आहे.
केवळ दोन महिने शिल्लक असून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याच्यादृष्टीने पालिका प्रशासनानेही तयारी केली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव वेगळा असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाला दोन महिने शिल्लक असून अश्यात मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल एक मोठं विधान केलं आहे. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शुभांगी गोखले यांनी हे विधान केलं असून, त्यांना नेटकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे.
यावेळी बोलताना अभिनेत्री शुभांगी गोखले म्हणाल्या की, “माझ्या काही आठवणी नाहीत. मी मराठवाड्याची असल्याने आमच्याकडे काही हे प्रस्थ नाही. पश्चिम महाराष्ट्रात घरोघरी गणपती असतो आणि मुंबईत तर बाहेरून आलेली माणसं सुद्धा गणपती बसवतात.
नेपाळ, युपीवरून आलेले लोकसुद्धा गणेशोत्सव साजरा करतात. पण, खरा गणपती हा कोकणातला आहे. मुंबईत अलीकडे बाहेरून आलेली माणसं सुद्धा गणपती बसवतात. टिळकांनी सुरू केल्याने तेव्हा सार्वजनिक गणपतीचे मेळे व्हायचे.
ते स्वरूप थोडं कमी होतं किंवा माझ्या वाटल्या एवढं काही आलं नाही. पुण्यात आल्यावर मी पाच मानाच्या गणपतींचं दर्शन घेतलं. त्यानंतर मुंबईतला गणेशोत्सव सुद्धा पाहिला. खरं सांगू का म्हणजे त्याच फार अवडंबर झालं आहे.
खूप चुकीच्या गोष्टी होतात. रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही गणेशोत्सव साजरा करता. दहा दिवस उत्सव साजरा करता आणि त्याच्या मागे संध्याकाळी दारू पिऊन पत्ते खेळत असतात. हे कोणीच अमान्य करू शकत नाही. हे चांगलं नाही. याची आता गरज नाही.
हे अजिबातच चांगलं नाही. सार्वजनिक गणपती आपण मोठ्या भक्तिभावाने करतो. पण मला असं वाटतं आता आपण सार्वजनिक गणपती नाही केले पाहिजेत. सगळी एनर्जी वाया जात असून, सगळ्या प्रकारचं प्रदूषण होत आहे.
मला वाटतं घरोघरी जो गणपती बसतो तो खूपच सुंदर असतो.’ असं त्या म्हणाल्या आहेत. मात्र, आता शुभांगी गोखले यांच्या या विधानामुळे अनेकांचे मने दुखावली असून नेटकरी देखील त्यांच्यावर टीका करत आहे.