सिडनी – भारताचा नवोदित फलंदाज शुभमन गिल याचे भवितव्य उज्ज्वल असून पुढील दशक तो निश्चितच गाजवेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू माइक हसी याने व्यक्त केला.
मेलबर्न कसोटीद्वारे गिलने पदार्पण केले. या सामन्यात दोन्ही डावांत त्याने चांगली कामगिरी केली, त्याची फलंदाजी व त्याचा दृष्टिकोन पाहूनच त्याच्या गुणवत्तेची साक्ष येते, असेही हसी म्हणाला.
मेलबर्न कसोटीत गिलने पहिल्या डावात 45 तर, दुसऱ्या डावात नाबाद 35 धावा केल्या. पुढील दशक गिलसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. पृथ्वी शॉच्या जागी गिलला संधी देण्यात आली होती. त्याने संधीचा फायदा घेत चांगली फलंदाजी केली. गिलला जास्तीत जास्त संधी देणे आवश्यक आहे.
एकदा त्याच्यावरचे दडपण दूर झाले की त्याची खरी प्रतिभा सिद्ध होईल. त्याच्याकडे तंत्र आहे, आक्रमक फलंदाजी करण्याची तसेच गोलंदाजांवर प्रभुत्व गाजवण्याचीही क्षमता आहे. पुढील काळात त्याच्या नावावर अनेक कामगिरी नोंदल्या जातील, असेही हसीने सांगितले.