विविधा: श्रीपाद सातवळेकर

माधव विद्वांस

शतायुषी, चित्रकार, संस्कृत पंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म सावंतवाडी संस्थानातील कोलगाव येथे 19 सप्टेंबर 1867 रोजी झाला. इंग्रजी सहावीपर्यंतचे शालेय शिक्षण आणि चित्रकलेच्या पहिल्या दोन परीक्षा त्यांनी सावंतवाडी येथेच दिल्या. त्यांचे पुत्र माधव सातवळेकर हेही चित्रकार होते. 1890 मध्ये त्यांनी मुंबईत सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेच्या आणि शिल्पकलेच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. प्रतिष्ठेचे “मेयो’ पदकही दोनदा (एकदा चित्रकलेसाठी; दुसऱ्यांदा शिल्पकलेसाठी) मिळाले. औंध संस्थानचे अधिपती भवानराव पंतप्रतिनिधी ह्यांचा स्नेहही त्यांना ह्याच काळात लाभला. वर्ष 1900 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सातवळेकरांना औंध संस्थानातच नोकरी मिळाली. पण ती सोडून हैदराबाद येथे गेले. तेथे त्यांनी स्वतःचा स्टुडिओ काढला.

त्यांनी 1918 मध्ये “स्वाध्याय मंडळा’ची स्थापना औंध येथील वास्तव्यात केली होती. औंध येथील वास्तव्यात वैदिक धर्म, हे हिंदी व पुरुषार्थ हे मराठी मासिक त्यांनी काढले. त्यातून प्रामुख्याने वैदिक वाङ्‌मय व तत्त्वज्ञान या विषयांचे लेखन त्यांनी केले. त्यांची ग्रंथसंपदा विपुल असून मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये त्यांचे सुमारे 400 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.पुराणग्रंथांसंबंधीचे गैरसमज दूर करण्यासाठी लिहिलेला पौराणिक गोष्टींचा उलगडा असे धर्मविषयक विपुल लेखन त्यांनी प्रसिद्ध केले. काही कारणामुळे 1 जुलै 1948 रोजी गुजरातमधील पारडी येथे त्यांनी मंडळाचा कारभार हलविला. पारडी येथील मुद्रणालयातील यंत्रसामग्री जर्मनीहून आणली होती.

स्वाध्याय मंडळातर्फे वैदिक वाङ्‌मयाचे संशोधन, अनुवाद, प्रकाशन इ. कामे केली जातात. या संस्थेला 101 वर्षे पूर्ण झाली आहेत. एक चित्रकार म्हणून हैदराबादमध्ये त्यांचा निजामाशी संबंध आला आणि जमही बसला. व्यक्‍तिचित्रकार म्हणून ते ख्याती पावले. त्यांनी चारही वेदांच्या शुद्ध संहिता, समग्र सार्थ महाभारत, सार्थ अथर्ववेद इ. ग्रंथ लिहिले. 26 जुलै 2005 रोजी मुंबईतील अतिवृष्टीच्या तडाख्यात त्यांचे पुत्र माधव ह्यांच्या स्टुडिओत असलेली सातवळेकर पितापुत्रांची अनेक चित्रे नष्ट झाली. पंडितजींनी चित्रकलेवर समीक्षात्मक लेखनही केले होते. त्यांना वेदमूर्ती, वेदवाचस्पती इ. पदव्यांनी गौरविले आहे. पंडित सातवळेकर यांनी सुरू केलेल्या पुरुषार्थ या मासिकाचे नेपाळ विशेषांकामध्ये मला 1975 साली एक कविता व एक लेख लिहिण्याची संधी मिळाली होती. 31 जुलै 1968 रोजी त्यांचे 101 वर्षांचे असतानाच निधन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.