Shrikar Pardeshi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून 2001 बॅचचे महाराष्ट्र केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्रीकर परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परदेशी यांनी यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केलं आहे. श्रीकर परदेशी यांनी प्रतिनियुक्तीवर पीएमओमध्ये देखील काम केलं आहे. ही बदली नव्या सरकारच्या काळातील पहिली मोठी बदली ठरली आहे.
यापूर्वी 12 जुलै 2022 रोजी श्रीकर परदेशी यांची तत्कालीन उपमुख्यमंत्र्याचे उपसचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. म्हणजेच आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.
कोण आहेत श्रीकर परदेशी?
श्रीकर परदेशी भारतीय प्रशासकीय सेवेतील 2001 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणून काम केलं आहे. ते नांदेडचे जिल्हाधिकारी होते. याशिवाय पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.
दरम्यानच्या काळात श्रीकर परदेशी यांनी पंतप्रधान कार्यालयात म्हणजेच पीएमओमध्ये प्रतिनियुक्तीवर काम केले. तो कालावधी संपल्यानंतर ते राज्यात जून 2021 मध्ये परतले होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार 30 जून 2022 ला स्थापन झाल्यानंतर काही दिवसांमध्येच श्रीकर परदेशी यांना सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन उपमुख्यमंत्र्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.
श्रीकर परदेशी हे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे आहेत. त्यांचे एमबीबीएस- एमडीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. 2001 मध्ये ते महाराष्ट्रातून पहिल्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झाले होते.