मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार चिरंजीव श्रीकांत शिंदे हे आपल्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसूनच कारभार चालवत असल्याचा एक फोटो राष्ट्रवादीच्या नेत्याने ट्विट केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्विट केला आहे. त्यात श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरच बसल्याचे स्पष्ट दिसत असून त्या खुर्चीच्या मागेही मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन असे स्पष्ट लिहिलेले दिसत आहेत.
मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांचे म्हणणे श्रीकांत शिंदे या खुर्चीवर बसून ऐकत आहेत, असेही यात दिसते आहे. वरपे यांनी खासदार श्रीकांत शिंदे हे सुपर सीएम झाल्याबद्दल त्यांचे खोचकपणे अभिनंदनही केले आहे. हा कोणता राजधर्म?, असा कसा धर्मवीर, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान, या संबंधात श्रीकांत शिंदे यांनी खुलासा केला आहे की वरपे यांनी ट्विट केलेला फोटो मंत्रालय किंवा वर्षा बंगल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा नाही तर आमच्या घरातील खुर्चीचा आहे. या खुर्चीच्या मागे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन लिहिले गेले असले तरी त्याकडे आपले लक्ष गेले नाही. त्या बोर्डाची आपल्याला कल्पना नव्हती. तथापि, ही माझीच खुर्ची आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.