मांगल्याचा श्रीगणेशा उद्यापासून…, लाडक्‍या गणरायाच्या आगमनासाठी अवघे पुणे शहर सज्ज

मानाचे आणि प्रमुख मंडळेही जपणार साधेपणा

पुणे – शहराचा वैभवशाली गणेशोत्सव करोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदादेखील साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय शहरातील मानाच्या आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. भाविकांनीदेखील ऑनलाइन स्वरुपात बाप्पांचे दर्शन घेण्याचे आवाहन मंडळांनी केले आहे. शुक्रवारी सकाळी मंगलमय वातावरणात गणरायाचे आगामन होणार असून, यासाठी मंडळे आणि पुणेकरदेखील सज्ज झाले आहेत.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी 12.30 वाजता गुरुजी तालीम गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते होईल. येथील मंदिरातच गणपती विराजमान होणार आहे. ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजित केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे यांनी दिली.

श्रीमंत दगडुशेठ गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने शुक्रवारी सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. ट्रस्टचे यंदा 129 वे वर्ष आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री व मिलींद राहुरकर गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा होईल.

अखिल मंडई गणपती
अखिल मंडई मंडळाचा 128 वा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. मंदिरातच शारदा गजानन विराजमान होणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि मीना भोंडवे यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता प्राणप्रतिष्ठा होणार आहे, अशी माहिती मंडळाचे संजय मते यांनी दिली.

मानाचा पहिला : कसबा गणपती
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी होणार आहे. भाविकांना हा सोहळा घरातून पाहता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली.

मानाचा दुसरा : तांबडी जोगेश्‍वरी
मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्‍वरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी 12 वाजता वेदमूर्ती मोरेश्‍वर घैसास यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी दिली.

मानाचा तिसरा : गुरुजी तालिम
मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी 1 वाजता उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी दिली.

मानाचा चौथा : तुळशीबाग गणपती
मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी 12.30 वाजता व्यावसायिक युवराज ढमाले यांच्या हस्ते होणार आहे. गणेश याग, मंत्रजागर असे धार्मिक विधी गणेशोत्सवात होणार आहेत, अशी माहिती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी दिली.

मानाचा पाचवा : केसरीवाडा गणपती
मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठा मंडळाचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. या वेळी परंपरेप्रमाणे सनईचौघडा वादन होणार असल्याची माहिती मंडळाचे अनिल संकपाळ यांनी दिली.

अथर्वशीर्ष पठणही ऑनलाइन
यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्‍य नसल्याने ट्रस्टने कार्यक्रमांचे आयोजन ऑनलाइन केले आहे. ऋषीपंचमीनिमित्त शनिवारी दि.11 सप्टेंबर रोजी पहाटे 6 वाजता अथर्वशीर्ष पठण सोहळा ऑनलाइन पद्धतीने होईल. ट्रस्टच्या फेसबुक पेज, इंस्टाग्रामयाद्वारे या उपक्रमाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.