श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा येथे मल्हारसृष्टी उभारणार

विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटनप्रसंगी आमदार सुरेश गोरेंचे प्रतिपादन
राजगुरूनगर- श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा येथे मल्हारसृष्टी उभारण्यात येणार असून त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून या मल्हार सृष्टीमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी केले.
श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे निमगाव खंडोबा मंदिर ते गोसासी पाबळररोड राज्यमार्ग क्र.103. रस्ता करणे (साडेचार कोटी), निमगाव ते वाटेकरवाडी बंधारा रस्ता (24 लाख), निमगाव वाटेकरवाडी बंधारा रस्त्यावर साकव पूल बांधणे(30 लाख) जिल्हा नियोजन निधीतुन निमगाव खंडोबा मंदिर दर्शनमार्ग सभामंडप व पायरी बांधकाम (33 लाख), खंडोबा मंदिर परिसरात स्वच्छतागृह बांधणे (10 लाख), व्यायामशाळा साहित्य (11लाख), कारभारी-अण्णावस्ती रस्ता (साडेसात लाख), खंडोबा मंदिर येथे शुद्धपाणी प्रकल्प (3लाख), हायमास्ट दिवा बसवणे(दीड लाख), खंडोबामंदिर पायथ्याशी उमाजी नाईक नियोजित स्मारक संरक्षक भींत बांधणे (7 लाख)अशा तब्बल साडेपाच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भुमिपूजन, उद्घाटन आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते शनिवारी (दि.14) करण्यात आले, त्यावेळी झालेल्या कार्यक्रमातत ते बोलत होते.
यावेळी राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, तनुजा घनवट, पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, सदस्य अंकुश राक्षे, ज्योती अरगडे, अमर कांबळे, किरण मांजरे, विजय शिंदे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, नगरसेवक शंकर राक्षे, माजी सरपंच मारुती सातकर, एल. बी. तनपुरे, बाळासाहेब थिटे, संभाजी कुडेकर, केशव अरगडे, निमगावचे माजी सरपंच अमर शिंदे, उपसरपंच मीना पारधी, संतोष शिंदे, बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष विठ्ठल शिंदे, रुपाली भालेकर, मोहन शिंदे, संजय राऊत, मनोहर गोरगल्ले, सारिका राऊत, दुर्गा तांबे, समीर पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आमदार गोरे म्हणाले की, काम कसे, कोणते आणि कधी करावे यांचे उत्तम उदाहरण निमगाव ग्रामस्थ आहेत. अनेक विकास कामांमध्ये ग्रामस्थांनी सहभाग घेतल्याने गावात मोठी विकास कामे झाली आहेत. येथील श्रीक्षेत्र खंडोबा मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी व भाविकांसाठी आवश्यक त्या आधुनिक सोयी-सुविधा देण्यासाठी निधीकमतरता पडू देणार नाही. मंदिराच्या पायथ्यशी उमाजी नाईक यांचे स्मारक स्मारक उभारण्यात येईल. पाणीपुरवठा योजनेचे काम पुढील वर्षी मार्गी लावण्यात येणार आहे. वाटेकर वाडीकडे जाणारा भीमा नदीवरील पुलाचे काम महत्त्वाचे आहे, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. माजी सरपंच अमर शिंदे यांनी गावाच्या विकासासाठी चांगले काम केले. शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे लोकप्रतिनिधींनी पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी प्रचार प्रसार करावा. गावात कोणीही बेघर राहता काम नये. गावाच्या विकासाठी पाठपुरावा केल्याने विकास कामे झाली, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम कराळे यांनी, तर सरपंच बबनराव शिंदे यांनी आभार मानले.
- मोठ्या प्रमाणात निधी गावाला मिळाल्याने अनेक विकासाची कामे मार्गी लागणार आहेत. श्री खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भविकांची गैरसोय दूर करण्यासाठी अनेक जिल्हा परिषद सदस्यांचा निधी उपलब्ध झाला आहे. वाटेकरवाडी ते निमगावला जोडणाऱ्या भीमानदीवर पूल बांधण्यात यावा.
– बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष, राज्य पोलीस पाटील संघटना - खंडोबाच्या दर्शनाला आलेला भाविक भक्तांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार गोरे व जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला आहे. खंडोबाबाचे दर्शन घेऊन कनेरसरच्या यमाईमंदिराकडे जाणार महत्त्वाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. रस्त्यांबरोबर विविध आवश्यक कामे आमदार गोरे यांनी मार्गी लावली. निमगाव परिसरातील नागरिक उद्याच्या निवडणुकीत गोरे यांच्या पाठीशी राहील.
– विजय शिंदे, ग्रामस्थ




