पिंपरी, दि. 23 – चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत वडमुखवाडी येथील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयाची खेळाडू प्रियंका इंगळे भारताचे प्रतिनिधित्त्व करत आहे. तामूलपूर गुवाहाटी आसाम येथे या स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या वतीने प्रियंका इंगळे हिची भारतीय संघात आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झालेली आहे.
प्रियांकाने आजपर्यंत 20 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. मागील वर्षी मध्यप्रदेश जबलपूर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये तिला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून राणी लक्ष्मीबाई पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याच प्रमाणे गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय खो-खो नॅशनल स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले आहे. किशोर गटातील राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून दिला जाणारा “ईला’ पुरस्कार तिने मिळवला आहे.
खो-खो प्रशिक्षक अविनाश करवंदे आणि शालेय क्रीडा शिक्षक संजय जैनक यांनी प्रियांकाला मार्गदर्शन केले आहे. तिच्या यशाबद्दल रामभाऊ मोझे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, शालेय समिती अध्यक्षा प्रा. अलका पाटील, विद्यालयाचे प्राचार्य राजकुमार गायकवाड, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तीचे अभिनंदन केले.