ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून निर्माण झालेल्या कऱ्हा नदीच्या तीरावर सासवड नगरात श्री चांगावटेश्वर वसले आहे. नारायणपूर मार्गावरील या मंदिराचा कळस हिरव्यागर्द सृष्टीराणीच्या मुकुटातील हिरा शोभत आहे. तेराव्या शतकातील हे प्राचीन मंदिर आहे. चौदाशे वर्षे वयोमान असलेल्या श्री चांगदेवांनी या मंदिराची प्रतिष्ठापना केल्यामुळे चांगावटेश्वर म्हणतात.
मंदिराच्या पायऱ्या चढून आत गेल्यानंतर मूळ काळ्या पाषाणातील हेमाडपंथी मंदिराचे सुशोभित दर्शन घडते. उत्कृष्ट वास्तुकलेचा आणि शिल्पकलेचा हा अप्रतिम वारसा आहे. नंदीमंडप, सभामंडप आणि गर्भागार असे तीन भाग आहेत. नंदीमंडपात काळ्या पाषाणातील भव्य, डौलदार आणि सालंकृत नंदी विराजमान आहे. नंदीमंडपाच्या स्तंभावर शरभ शिल्प, महिषासुरमर्दिनी शिल्प, शाखामृग, नर्तक, मयूर, कुस्तीगीर यांची सुंदर शिल्पे व पानाफुलांची वेलबुट्टी आहे. डावीकडे श्रीगणेश मूर्ती आहे.
मुख्य सभामंडपाच्या स्तंभांवर व छताच्या आतील घुमटावर सुंदर कोरीवकाम आहे. कासवपूजन करून लीन होऊन गर्भागारात प्रवेश करतात. समोर पांढरीशुभ्र गणेशमूर्ती तसेच प्राजक्त फुलांनी आणि बिल्वपत्रांनी सजलेली काळ्या पाषाणातील भव्य शाळुंका पाहून परमानंद लाभतो. आवारात नंदीसह छोटेसे शिवमंदिर आणि तुळशी वृंदावन दिसते. मंदिराच्या कळसावर गजराजांच्या पाठीवरील सुबक गोपुरांमध्ये देवताशिल्पे व पानाफुलांची सुंदर नक्षी आहे. गोमुखातील तीर्थ प्राशून अर्धप्रदक्षिणा घालताच उत्तुंग दीपमाळ व प्राजक्ताची पखरण झेलणारी सुंदर शिवलिंगे दिसतात.
मंदिराभोवती तटबंदी असून, आत ओवऱ्या आहेत. कऱ्हातीरावरील तीर्थकुंडाचे व श्रीसंत सोपानदेव समाधी मंदिराचे आवारातून दर्शन घडते. मंदिरात घुमणारा शिवध्वनी, केकारव, पाऊसनाद आणि कऱ्हेच्या गूजगोष्टी ऐकायला आणि शिल्प वैभव पाहायला इथे नक्कीच यायला हवे.
– माधुरी शिवाजी विधाटे