पुणे – भारत व इंग्लंड यांच्यात मंगळवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तसेच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने तर तो खेळू शकणार नाही, परंतु त्याच्या आयपीएल स्पर्धेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना त्यांच्या डावातील आठव्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टोने कव्हर ड्राइव्हचा फटका मारला. तो अडवताना अय्यरने सूर मारला होता. त्याचवेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर सपोर्ट स्टाफच्या मदतीने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले व त्याची अवस्था पाहता लगेचच त्याला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
श्रेयसची दुखापत गंभीर आहे. तो या मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने खेळू शकणार नाही तसेच येत्या 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेलाही त्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे. श्रेयस आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करतो. गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. मात्र, विजेतेपद मिळवण्यात त्यांना अपयश आले होते.
रोहितही जायबंदी
भारतीय संघाचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्मालाही दुखापत झाली असून, या मालिकेतील उर्वरित दोन सामने त्याला खेळता येणार नसल्याचे संकेत खुद्द बीसीसीआयनेच दिले आहेत. फलंदाजी करत असताना त्याच्या उजव्या हाताच्या कोपराला चेंडू लागला होता. त्यानंतर फिजिओकडून प्राथमिक उपचारही त्याने घेतले. मात्र, त्याच्या दुखापतीच्या स्वरूपाबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.