लोणीकंद (वार्ताहर) – मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून पेरणे ते बकोरी व लोणीकंद ते डोंगरगाव या रस्त्याचे भूमिपूजन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पार पडले.
मात्र उद्घाटन केलेल्या नामफलकावर हे काम मंजूर केलेले जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव नसल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हा नामफलक हटवला. यामुळे विधानसभेच्या आधीपासूनच शिरूर-हवेली मतदारसंघात श्रेयवाद रंगताना दिसत आहे.
तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत वर्ग करण्यात आलेल्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे सोशल मीडियावर समजले.
हे भूमिपूजन होताच बोर्ड काढून टाकण्याचा इशारा देत बोर्डला काळे लावण्याच्या इराद्याने गेलेल्या संदीप भोंडवे व भाजप पदाधिकार्यांनी नामफलकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव असल्याने केवळ सन्मान पूर्वक बाजूला काढून ठेवला.
येवलेवस्ती (पेरणे) ते बकोरी व लोणीकंद ते डोंगरगाव या रस्त्याचे भूमिपूजन 16 सप्टेंबर 2023 रोजी माजी खासदार शिवाजीदादा आढळराव, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, संदीप भोंडवे, विपुल शितोळे, शामराव गावडे, पेरणे गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत झाले होते.
या रस्त्यांचे भूमिपूजन होऊन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अशोक पवार यांनी पुन्हा एकदा रस्त्याचे भूमिपूजन केले, असे सांगत संदीप भोंडवे यांनी आजच्या प्रकाराचा निषेध केला.
या वेळी संदीप भोंडवे यांच्यासह युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव, महिला मोर्चाच्या पूनम चौधरी, प्रदीप सातव, शामराव गावडे, विपुल शितोळे, गणेश चौधरी, दीनेश झांबरे व भाजपा-शिवसेना तालुका संघटनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.