पुणे : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षांकडून पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा करण्यात आला आहे. या प्रश्नावर कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी माझे श्रेष्ठी मला जे सांगतात ते मी करतो. असे सांगत बोलणे टाळले. त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे राहणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुणे येथे आमदार पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. राज्य शासनाने जिल्हा परिषदेचा अखर्चित राहिलेला सुमारे 133 कोटींचा निधी पुन्हा शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर विचारले असता पाटील म्हणाले, की ही बाब मला तुमच्याकडून कळली. मी त्याची माहिती घेतो. परत गेलेला निधी पुन्हा एकदा रुटीन सुरू झाल्यावर घेता येतो.
शपथविधीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निमंत्रण दिले नव्हते, यावर विचारले असता, पाटील यांनी सांगितले, की देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांतील वरिष्ठ नेत्यांना फोन केले होते, तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला माहिती मिळाली की तुम्हाला कळवितो, असेही पाटील यांनी सांगितले.