श्रीविठ्ठल : एक लोकदेव

पांडुरंगाचे कमरेवरचे हात असं सांगतात की, ज्या भवसागराची प्रत्येक माणसाला भीती वाटते, हा भवसागर आपण कसा तरून जाऊ आणि आपली जीवननैय्या पलीकडच्या तिराला कशी लावू हा माणसाला प्रश्‍न पडतो, त्या भीतीचे निराकरण आणि त्या प्रश्‍नाचे उत्तर पांडुरंग कंबरेवर हात ठेवून प्रत्येकाला देत असतो. तो सांगतो, असे माझ्या भावभोळ्या भक्तांनो, जो भवसागर तुम्हाला पार करण्याची भीती वाटते, तो किती खोल आहे तर प्रत्येकाच्या कमरेच्या उंचीएवढा. कोणीही सहजगत्या चालत चालत जाऊन तो पार करू शकेल, असे आश्‍वासक उत्तर पांडुरंग हातांच्या खुणेने सगळ्यांना सांगतो, ही बाब मनाला उभारी देणारी आहे.

संपूर्ण भारतवर्षात लाखोंच्या संख्येने असलेल्या मंदिरांमधील देव-देवतांच्या मूर्तीकडे बघितलं की बहुतांशी मूर्तीच्या स्वरूपातलं एक समान वैशिष्ट्य लक्षात येतं, ते म्हणजे या मूर्तींचे हात आशीर्वादासाठी उंचावलेले आहेत. अवतीभवती वावरणाऱ्या माणसाशी साधर्म्य दाखविणाऱ्या या द्विभूज मूर्तीशिवाय चतुर्भुज-अष्टभुज मूर्तीतील आशीर्वाद देणाऱ्या हातांशिवाय इतर हात शस्त्र-अस्त्र आयुधांनी युक्‍त आहेत. प्रत्येक हातात खड्‌ग, धनुष्य, गदा व वेगवेगळी आयुधं आहेत. पंढरीच्या पांडुरंगाचे मात्र असे नाही. या मनीमानसी बसलेल्या विठू सावळ्याचे दोन्ही हात कंबरेवर आहेत. म्हणूनच “कर कटेवरी ठेवुनिया उभा विठुराया’ असे म्हटले जाते. विठुरायाने आपले हात कंबरेवर का ठेवले असावेत, इतर देवांसारखे हा लोकदेव आपल्या दरबारी अठरापगड जातीच्या समतत्त्व भक्‍तिभावाने येणाऱ्या जनसंमर्दावर आपल्या हाताने आशीर्वचनाची फुले का उधळत नाही, हा स्वाभाविकपणे पडणारा प्रश्‍न आहे. पांडुरंगाने आपले लोकदेवत्व खरे तर कुणालाही मनःपूर्वक आशीर्वाद देऊन अधिक उत्तम प्रकारे सिद्ध करावयास हवे होत; पण पांडुरंगाचे हात कमरेवर आहेत. मात्र या हातांचा अर्थ अभ्यासकांनी फार सुरेख पद्धतीने उद्‌धृत केला आहे. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले आपल्या “श्रीपांडुरंगाष्टकम्‌’ या ग्रंथांत पांडुरंगाविषयी खूप सुरेख विवेचन करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, “पांडुरंगाला पाहिल्यावर जगाचा रंग फिका वाटतो. पांडुरंग म्हणजे ज्याचा रंग पांडु आहे तो. पांडू म्हणजे स्वच्छ. म्हणून पांडुरंग स्वच्छ रंग असलेला. सृष्टीमध्ये भोगाचा रंग आहे. पण भक्तीपुढे त्याला चकाकी नाही, तो फिका पडतो. भक्तीचा रंग हा सृष्टीतील श्रेष्ठतम्‌ रंग आहे. तो स्वच्छ आहे. हा स्वच्छ रंगच पांडुरंगाचा आहे.”

हा विठोबा सर्वांना सारखाच प्रिय वाटतो कारण तो लेकुरवाळा आहे. जनाबाईंनी आपल्या एका अत्यंत लोकप्रिय अभंगात संतांच्या मांदियाळीत रमणाऱ्या या विठ्ठलाचे अतिशय सुरेख वर्णन केले आहे. त्या म्हणतात, “”विठो माझा लेकुरवाळा। संगे लेकरांचा मेळा। निवृत्ती हा खांद्यावरी। सोपानाचा हात धरी। पुढे चाले ज्ञानेश्‍वर। मागे मुक्ताई सुंदर। गोरा कुंभार मांडीवरी। चोखा जीवा बरोबरी। बंका कडियेवरी। नामा करांगुळी धरी। जनी म्हणे गोपाळा। करी भक्तांचा सोहळा।।” विठुरायाच्या मनोवृत्तीचे एवढे सर्वांगसुंदर वर्णन दुसरे कोणतेच नसेल. विटेवर समचरण स्थितीत उभ्या असलेल्या विठुरायाच्या पायाखालच्या विटेमध्ये कर्मयोग आणि भक्तियोग यांचा जणू समन्वय झालेला आहे. तो समचरण स्थितीत कमरेवर हात ठेवून उभा असला तरी संतांना आणि भक्‍तांना तयाची ही मूर्ती अतिशय रमणीय, नयनमनोहर, स्वर्गीय सुख देणारी आणि विश्‍वशांतीचा संदेश प्रदान करणारी अशीच कायम वाटत आली आहे.

पंढरीच्या पांडुरंगावर प्रेम करणाऱ्या साऱ्या संतांनी भक्तिपंथाचा पुरस्कार केला आणि सामाजिक ऐक्‍य भावना अधिकाधिक पुष्ट केली. भक्तीचा मार्ग माणसाच्या हृदयापर्यंत सहजगत्या पोहोचतो आणि हाच माणूस भोवतीच्या दहा माणसांना या “पंढरीच्या भूता’च्या भक्तीचे वेड लावू शकतो याची संतांना खात्री होती. ती आज वारीच्या मार्गावर चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या रूपाने दृश्‍य स्वरुपात अवतरली आहे.

इ.स. सहाव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंतचा सातशे वर्षांचा कालखंड पंढरीचे महात्म्य वाढविणारा ठरला. तेराव्या शतकानंतर तर श्री. विठ्ठलाच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढच होत गेलेली दिसते. “”विठ्ठला माय बाप चुलता। विठ्ठल भगिनी भ्राता।” असं तुकोबाराय म्हणतात. त्यातून विठ्ठलाविषयीची सर्व समावेशक प्रिती समोर उभी ठाकते. त्याचवेळी “आकार उकार मकार करिती हा विचार। विठ्ठल अपरंपार न कळे रया।” असं ज्ञानोबाराय म्हणतात. त्यातून श्रीविठ्ठलाचे ओंकारापलीकडचे स्वरूपही लक्षात येते आणि या दोन्ही टोकांमध्ये सर्वसामान्य भक्ताला दिसणारा श्रीविठ्ठल अभूतपूर्व म्हणावा लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.