Accident News : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात भीषण अपघात घडून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. हायवा टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेनंतर कारला आग लागल्याने कीर्तनकार श्रीहरी महाराज पुरी यांच्या पत्नी आणि मुलाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कापसी फाट्याजवळ बीड-अहिल्यानगर महामार्गावर शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला पुष्पा पुरी (४७) आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश पुरी (२८) हे कारने प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारचा चक्काचूर झाला आणि काही क्षणांतच वाहनाने पेट घेतला. आगीत अडकलेल्या माय-लेकरांनी बाहेर पडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र आगीची तीव्रता इतकी मोठी होती की त्यांना बाहेर पडता आले नाही. दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित गावकरी आणि शेतकऱ्यांनी आग विझवण्याचे आणि दोघांना वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र ते निष्फळ ठरले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याची मोटार सुरू करूनही प्रयत्न करण्यात आले, परंतु आगीचा भडका मोठा असल्याने मदत होऊ शकली नाही. दुर्दैवी योगायोग या घटनेचा आणखी एक दुर्दैवी योगायोग म्हणजे, अपघाताच्या वेळी श्रीहरी महाराज पुरी हे जवळच कीर्तन करत होते. कीर्तनादरम्यान आलेल्या फोनवरून त्यांना या दुर्घटनेची माहिती मिळाली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, माय-लेकरांवर त्यांच्या मूळगावी साळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.