करोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने केलेल्या सूचनांचे नागरिकांकडून पालन
पुणे – पुणे महानगरपालिकेने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करतानाच विसर्जन मिरवणुकीवरही बंदी केली आहे. याबाबत नियमावलीही जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक संस्था पुढे आल्या असून उपनगरांत ठिकठिकाणी फिरते विसर्जन हौद उपक्रम राबविला जात आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पाचव्या दिवशीही फिरत्या हौदात विसर्जन करणाऱ्या गणेशभक्तांची संख्या वाढली होती. त्यामुळे उपनगरांत तरी उपक्रम यशस्वी ठरत असल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या दारीच विसर्जन हौद जात असल्याने यातून करोनाचे संरक्षित नियम पाळून विसर्जन केले जात असल्याने महानगरपालिकेचा सुरक्षित गणेशोत्सवाचे ध्येय साध्य होत असल्याचे दिसते. दहाव्या दिवशीही नागरिक या उपक्रमास चांगला प्रतिसाद देतील, अशी आशा उप्रकम आयोजकांनी व्यक्त केली आहे.