कर्वेनगरमधील “मिलेनियम नॅशनल स्कूल’च्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पुणे – महाराष्ट्रासह देश विदेशातील गणेशभक्तांसाठी पर्वणी असणारा “गणेशोत्सव’ कला, संस्कृती, परंपरा आणि सामाजिकतेचे प्रतिबंब आहे. बदलत्या आधुनिक काळात गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत आहे. मात्र या नव्या स्वरुपामुळे पर्यावरणीय प्रश्नांमध्ये भर पडत आहे. त्यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घरोघरी विराजमान होणारी “प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ची गणेशाची मूर्ती आणि ही मूर्ती विसर्जन केल्यानंतर होणारे पाण्याचे, नदीचे प्रदूषण. ही समस्या टाळण्यासाठी दै. “प्रभात’तर्फे यावर्षी “माणिकचंद’ प्रस्तुत “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ ही शाडूच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा दि.30 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ कार्यशाळेचा सोमवारी कर्वेनगरमधील “मिलेनियम नॅशनल स्कूल’मध्ये शुभारंभ झाला.
पाहा फोटो : विद्यार्थ्यांनी मातीपासून घडवला बाप्पा!
पाहा व्हिडीओ : प्रभात ग्रीन गणेशा” कार्यशाळेला सुरवात
साहजिकच या बदलांची सुरूवात ही विद्यार्थीदशेत होणे आवश्यक आहे. या संस्कारक्षम वयात पर्यावरण समतोलाची जाणीव झाली तर त्याचा उपयोग नक्कीच पुढील आयुष्यात होऊ शकतो. त्यामुळेच यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले आहे. या कार्यशाळेअंतर्गत विद्यार्थ्यांना अतिशय कमी वेळेत, मोजक्या साहित्यांचा वापर करून श्रीगणेशाची सुबक मूर्ती कशी तयार करावी, याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी सहप्रायोजक म्हणून बांधकाम व्यवसायातील अग्रणी “सिद्धीविनायक ग्रुप’, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील “पास्को एन्व्हायर्मेंटल सोल्युशन्स’ आणि “महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि.’, तसेच “श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’, “महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ’ आणि “पुणे महानगरपालिका’ यांचे सहकार्य लाभले आहे.
उपक्रमाच्या पहिल्या दिवशी “मिलेनियम नॅशनल स्कूल’ मधील सुमारे 120 विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती साकारली. उपक्रमात सहभाग घेतल्याबद्दल दै. “प्रभात’ने प्रशस्तीपत्रक देऊन शाळेचा गौरव केला. शाळेतर्फे संचालक अन्वित फाटक यांनी दै. “प्रभात’चे व्यवस्थापक प्रवीण थूल यांच्याकडून प्रशस्तीपत्रक स्वीकारले.
मुलांनी अनेक वर्षे मातीकामाचा अनुभव घेतला नाही. दै. “प्रभात’च्या माध्यमातून मिळालेल्या या संधीचा विद्यार्थी आनंद घेत आहेत. प्रत्येक जण मग्न होऊन “बाप्पा’ साकारत आहेत. विद्यार्थ्यांचे पालक जेव्हा या मूर्ती पाहतील, तेव्हा या उपक्रमामागील विचार सर्वांपर्यंत पोहोचेल. ही प्रक्रिया आजमितीला पूर्णपणे परिणामकारक नसली. तरी याचे परिणाम मात्र दूरगामी आणि सकारात्मक आहेत. स्वत: गणपतीची मूर्ती तयार करून बसविण्यात वेगळीच गंमत आहे. सर्वांनी शाडूच्या मातीची मूर्ती तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदा अधिकाधिक जणांना “मूर्ती बनवा आणि त्याची प्रतिष्ठापना करा’, असे आवाहन करू इच्छितो.
– अन्वित फाटक, संचालक, मिलेनियम नॅशनल स्कूल
पहिल्यांदाच घेतलेल्या अनुभवाचा आनंद
स्वत:च्या हाताने “बाप्पा’ची मूर्ती साकारण्याचा अनुभव अप्रतिम होता. मातीच्या गोळ्यातून आम्ही सोपी पद्धत वापरुन मूर्ती तयार करु शकलो, याचे समाधान वाटते. दै. “प्रभात’ने आम्हाला ही संधी दिल्याने आम्ही याचा अनुभव घेऊ शकलो. यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी घरी शाडूच्या मातीची मूर्ती बसविणार आहोत. या माध्यमातून प्रदूषणदेखील कमी होण्यास मदत होणार आहे, अशी भावना विद्यार्थ्यांनी दै. “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली.
शिक्षकांचाही उत्स्फूर्त सहभाग
दरवर्षी विद्यार्थ्यांना मूर्ती साकारता यावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. या कार्यशाळेमुळे शिक्षकांना सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा आनंद वाटतो. स्वत: मूर्ती साकारण्याचे समाधान अनोखे आणि अविस्मरणीय आहे, अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या.