जेजुरी गडावर श्रीगणेश विराजमान

जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव असलेल्या खंडेरायाच्या मल्हार गडावर वाजत गाजत लाडक्‍या बाप्पांचे आगमन झाले. सनई-चौघड्यांच्या मंगलमय वाद्यांत श्रीगणेशांची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्यानंतर शहर व पंचक्रोशीतील घराघरात लाडके बाप्पा विराजमान झाले.

कुलदैवत खंडेरायांच्या देवदर्शना बरोबरच गडकोट मार्गावर गणेश दर्शनाला विशेष महत्व आहे. गडाची पहिली पायरी चढतानाच श्रीगणेशाचे दर्शन घ्यावे लागते, त्यानंतर वीरभद्र, हेगडीप्रधान, मुख्य गडकोट आवारातील साक्षीविनायक यांचे दर्शन घेत खंडेरायाच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी श्रीगणेशापुढे नतमस्तक व्हावे लागते. मुळात खंडोबा हा महादेवाचा अवतार आणि त्यांचा पुत्र श्रीगणेश असल्याने पितापुत्राच्या दर्शनाची पर्वणी भाविकांना येथे मिळते.

1980 सालापासून गडकोट आवारात गणेश मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यास सुरुवात झाली. सालाबादप्रमाणे यंदाही कर्मचारी, पूजारी, सेवेकरी यांच्या वतीने गडकोट आवारात गणेशोत्सवास प्रारंभ करण्यात आला. यावेळी विश्‍वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे पाटील, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, पुजारी, सेवेकरी आणि कर्मचारी उपस्थित होते. कर्मचारी नितीन कुदळे यांना सपत्नीक गणेश पूजनाचा मान देण्यात आला, त्यानंतर शहर व पंचक्रोशीतील घराघरात वाजत गाजत लाडक्‍या बाप्पांचे आगमन होत प्रतिष्ठापणा करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.