जावळी पाणी फाउंडेशनतर्फे मतदानानंतर श्रमदान

दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ग्रामस्थांचा उपक्रम

मेढा – जावळी तालुक्‍यात विविध ठिकाणी उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत असताना पाणी फाउंडेशन टीम जावळीच्या सदस्यांनी मतदान करून श्रमदान करत नवीन उपक्रमाचा पायंडा पाडला. आज तांबी गावात त्याची सुरुवात झाली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकमेकांची जिरविण्यापेक्षा पाणी अडवून पाणी जिरवूया हा संकल्प मनात ठेवून पाणी फाउंडेशन टीम (जावळी) यांनी आजपासून श्रमदानाला सुरुवात केली.

सध्या मानवाकडून निसर्गाची अपरिमित हानी होत चालली आहे. यामुळे दुष्काळासारखी भयानक परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. याचा विचार करून भविष्यात तालुक्‍यात व परिसरात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून आत्तापासूनच प्रयत्नवादी राहण्याचा निर्धार पाणी फाऊंडेशन टीम जावळी यांनी केला आहे. त्याचाच भाग म्हणून दि. 23 एप्रिल रोजी मतदाना दिवशी श्रमदानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. जावळी तालुक्‍यात डोळ्यांना दिसणारं पाणी जास्त प्रमाणात आहे, पण त्याचा वापर सुयोग्य पद्धतीने होताना दिसत नाही.

श्रमदानाला सुरुवात करत असताना प्रथमतः तांबी तर्फ मेढा या गावाची निवड करण्यात आली. नियोजनाप्रमाणे सर्व जलमित्र सकाळी 6 पासून तांबी गावात एकत्र जमले. यानंतर श्रमदानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आज झालेल्या कामात एक बंधारा व सिसिटी यांच्या कामाला सुरुवात झाली. तसेच बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास गेले. यावेळी आलेल्या सर्व जलमित्रांना येताना फावडे, टीकाव, खोरे, व पाण्याची बाटली घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले होते.

श्रमदानावेळी सर्व निसर्गप्रेमींना व जलमित्रांना मार्गदर्शन करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या सौ. सुनीता पाटणे व कमलेश शिंदे यांनी उपस्थिती दाखविली. आपल्या मार्गदर्शनातून पाण्याचं महत्व आणि पाणी अडवून जिरवण्याचे फायदे सर्व उपस्थितांना पटवून दिले. पाणी फाऊंडेशन टीम च्या माध्यमातून इथून पुढेही अशीच कामे विविध दिवशी व विविध ठिकाणी होतच राहतील. आजच्या या श्रमदानासाठी सौ. सुनीता पाटणे, कमलेश शिंदे, पुष्पक राठोड, सुयश पाटणे, विजय मोकाशी व पाणी फाउंडेशन चे सर्व जलमित्र उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.