सातारा -प्राथमिक शिक्षक बॅंकेत गेल्या काही वर्षात सभासदांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. सेवानिवृत्त शिक्षकांच्या मागण्यांचा तर सत्ताधाऱ्यांना पुरता विसर पडला. आता निवडणूक आल्याने त्यांना सेवानिवृत्तांचा पुळका येत आहे. सभासद परिवर्तन पॅनेलच्या विजयासाठी सेवानिवृत्त शिक्षकांचा सक्रिय सहभाग असून शिक्षक बॅंकेचे वाटोळे करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन शिक्षक बॅंकेचे माजी संचालक व सेवानिवृत्त संघटनेचे तालुकाध्यक्ष हिंदुराव भोसले यांनी केले.
सभासद परिवर्तन पॅनेलचे कोरेगाव गटातील उमेदवार नितीन शिर्के, सुरेश पवार व इतर मागास प्रवर्गातील उमेदवार किरण यादव यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात श्री. भोसले बोलत होते. यावेळी यावेळी सुदाम खरात, शिवाजीराव साळुंखे, आर. टी. कदम, वसंत जाधव, शांताराम लेंभे, शामराव यादव, ज. ग. माने, शिवाजीराव माने, हनुमंतराव माने, तानाजी जाधव, राऊत गुरुजी, संतोष मांढरे, अनिल कदम, विजय जाधव, रामराव बर्गे, तानाजी नावडकर, सतीश शिंदे आदी उपस्थित होते. हिंदुराव भोसले म्हणाले, “सभासदांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली बॅंक टिकावी यासाठी सभासद परिवर्तन पॅनेलची स्थापना झाली आहे.
या पॅनेलचा धसका बॅंकेच्या सत्ताधाऱ्यांनी घेतला असून त्यांना आता पराभव दिसू लागल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार स्वच्छ प्रतिमा असणारे आहेत. सत्ताधाऱ्यांनी मागील पाच वर्षात बरेच उद्योग केल्याने मतदारांनी त्यांना पुरते झिडकारले आहे. या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या सर्व जागा मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असून यात सेवानिवृत्त शिक्षकांचा सक्रिय सहभाग असणार आहे.”
किरण यादव म्हणाले, “बॅंकेत पाच वर्षात अतिशय चुकीचा कारभार झाला. संचालकपदाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी आवाज उठवला. अनेकदा सभासदहिताचा, सेवानिवृत्तांच्या मागण्यांबाबत आम्ही पाठपुरावा केला. मात्र, बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी मनमानी कारभार केला. सभासदहितापेक्षा त्यांनी स्वहित जोपासल्याने शिक्षकांमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल प्रचंड चीड आहे. या निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने सत्ताधाऱ्यांनी सभासदांची दिशाभूल करणे सुरु केले आहे. मात्र, अशा फसवेगिरीला आता सूज्ञ सभासद भुलणार नाहीत.’ यावेळी सुदाम खरात, शिवाजीराव साळुंखे आदींनी मनोगत व्यक्त करुन परिवर्तन पॅनेलला मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, ल्हासुर्णे, कोरेगाव, रहिमतपूर, वाठार, पिंपोडे या विभागात सेवानिवृत्त शिक्षक प्रचार यंत्रणा राबवित आहेत.