बाह्यवळण रस्त्यासाठी उपसरपंच हिंमत हांडे यांचे बांधकाम विभागाला आव्हान
फुरसुंगी – मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले असून गेली दोन ते तीन वर्षांपासून रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावर “डांबर दाखवा आणि बक्षीस मिळवा’ अशी योजना सुरू करण्यात येणार असून बक्षिसाची रक्कम सार्वजनिक बांधकाम खात्यानेच जाहीर करावी, असे आव्हान हांडेवाडी गावचे उपसरपंच हिंमत हांडे यांनी विभागाला केले आहे.
मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गावर मंतरवाडी, हांडेवाडी चौक, हांडेवाडी चढ-उतार, उंड्रीचौक, आंबेकर हॉटेल, पिसोळीपर्यंतचा रस्ता जागोजागी खोदून ठेवलेला आहे. रस्त्यावर दगडगोटे, मातीचा राडारोडा पडला आहे.
रस्त्यावर सातत्याने धूळ उडत असते. यामुळे वाहनचालकांना अतिशय सावधतेने वाहने चालवावी लागत आहेत. येथून दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच, खड्ड्यांत आदळून वाहने नादुरुस्त होत आहेत. या कारणातून येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण झाले आहेत.
या रस्त्यावर आजपर्यंत अनेक अपघात झाले असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही हांडेवाडी गावचे उपसरपंच हांडे यांनी दिला आहे.