खड्डा दाखवा; ५० रुपये बक्षीस मिळवा

कॅन्टोन्मेंट भागात सामाजिक कार्यकर्त्यांची शक्‍कल

पुणे – लष्कर परिसरातील बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. मात्र, रस्त्यांवर खड्डे नाहीच अशा समजात बोर्ड प्रशासन वावरत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अनोखी शक्कल लढविली असून, रस्त्यांवरील खड्ड्याचे फोटो पाठविणाऱ्याला 50 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

शहरात बराच काळ सातत्याने झालेल्या पावसामुळे लष्कर परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे परिसरातील वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: घोरपडी गाव, घोरपडी बाजार रेसकोर्स रस्ता, जनरल बेऊर रोड, सोलापूर रस्ता, नेहरू मार्ग, सोलापूर बाजारमधील पूलगेट चौक, गोळीबार मैदान चौक ते खाणे मारूती मंदिरापर्यंत असलेला रस्ता, लुल्लानगर रस्ता, वानवडी बाजार रस्ता, वानवडी कमांड हॉस्पिटल रस्ता या भागात मोठ्या प्रमाणात मोठे खड्डे पडले आहेत.

यामधून वाट काढताना वाहनचालकांची तारांबळ उडत असून, काही ठिकाणी अपघात घडल्याचे प्रकारही समोर आले आहेत. याव्यतिरिक्त वाहतूक कोंडी, संथ गतीने होणारी वाहतूक या समस्याही उद्‌भवत आहेत. मात्र, बोर्ड प्रशासनाकडून या समस्येबाबत सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठीच आता “खड्डे दाखवा, 50 रुपये मिळवा’ ही घोषणा सामाजिक कार्यकर्त्यांकडून राबविली जात आहे.

कवडे म्हणाले, “बोर्डाच्या वतीने विकास कामांच्या नावाखाली 130 कोटी रुपयांची मुदत ठेव मोडण्यात आली. मात्र, हा निधी वापरूनही अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवण्यात आले. त्यामुळेच या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. बोर्डाला खड्डे दाखवण्यासाठीच बोर्डाच्या वेबसाइटवर फोटो पाठवावे असे आवाहन आम्ही करत असून, यामाध्यमातून नागरिकांचा सहभाग घेऊन अपघात रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

Leave A Reply

Your email address will not be published.