कलम 370 रद्द करण्यास विरोध करणाऱ्यांना जागा दाखवा

अमित शहा : देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील
मुबंई, दि. 22 (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्‍मीरला स्वतंत्र दर्जा देणारे कलम 370 हटवून त्या राज्याला देशाचे अभिन्न अंग बनविले आहे. लवकरच दहशतवाद संपुष्टात येऊन ते राज्य विकासाच्या मार्गावर येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच 370 रद्द करण्यास विरोध करणाऱ्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला जनतेने या निवडणुकीत जागा दाखवून द्यावी, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी मुंबईत केले.

विधानसभा निवडणुकीत भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर येईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपने घटनेचे कलम 370 आणि 35 ए रद्द करण्याविषयी देशव्यापी जनसंपर्क अभियान आयोजित केले आहे. त्याचा भाग म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सरोज पांडे, भूपेंद्र यादव, सुनील देवधर, उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार व भाजप नेते उपस्थित होते.

शहा म्हणाले, कलम 370 हटविल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. एकीकडे भारतमातेला सर्वस्व मानणारी भाजप आणि साथीदार आहेत. दुसरीकडे परिवारवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आहेत. आता जनतेला निर्णय करायचा आहे. ही शिवछत्रपतींची भूमी आहे. कलम 370 हटविण्यास विरोध करणाऱ्यांना जागा दाखवून देण्याचा निर्धार जनतेने करावा. संसदेत कॉंग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने कलम 370 हटविण्यास विरोध केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीवरून शरद पवार आणि राहुल गांधी यांना आपला सवाल आहे की, ते कलम 370चे समर्थन करतात की विरोध करतात, हे त्यांनी सांगावे. राहुल गांधी आजही कलम 370 हटविण्यास विरोध करतात. पण काही विषय हे देशहिताचे असतात. त्यावेळी पक्षीय राजकारण करायचे नसते हे त्यांनी इतिहासातून शिकावे, असा टोला त्यांनी लगावला.

राहुल गांधी यांनी अशा प्रकारे प्रथमच देशहिताच्या मुद्यावर विरोध केला नाही तर सर्जिकल स्ट्राईक केल्यावर त्यांनी पुरावे मागितले होते. एअर स्ट्राईकला विरोध केला होता. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारत तेरे टुकडे होंगे अशा घोषणा देणाऱ्यांना राहुल गांधी यांनी साथ दिली होती. आजही कलम 370 हटविताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस निर्लज्जपणे विरोध करतात, असा टीकाही त्यांनी केली.

नेहरूंच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्‍मीरचा प्रश्न निर्माण झाला
काश्‍मीरचे भारतातील विलिनीकरण हा विषय त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होता आणि हे विलिनीकरण पूर्ण झाले नाही. टोळीवाल्यांच्या वेशातील पाकिस्तानी आक्रमक सैन्याला भारतीय लष्कर पिटाळून लावत असताना नेहरूंनी अचानक युद्धविराम केला व त्यामुळे पाकव्याप्त काश्‍मीर भारताचा हिस्सा झाला नाही. असा युद्धविराम केला नसता तर पाकव्याप्त काश्‍मीरचा प्रश्नच निर्माण झाला नसता. नेहरूंच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्‍मीरचा प्रश्न निर्माण झाला. नंतर पंडित नेहरूंनी हा विषय संयुक्त राष्ट्रांमध्ये नेतानाही चुकीच्या कलमामध्ये नेला व त्यामुळे पाकव्याप्त काश्‍मीर हे विवादित क्षेत्र बनले. सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतर नेहरूंचा शेख अब्दुल्ला यांच्याशी 1952 मध्ये दिल्ली करार झाला आणि घटनेत कलम 370 व 35 ए समाविष्ट झाले, असे अमित शहा म्हणाले.

हिंसाचार थांबला, एकाचाही मृत्यू नाही
कलम 370 आणि 35 ए रद्द केल्यामुळे काही काळातच काश्‍मीर दहशतवादापासून मुक्त होऊन विकासाच्या मार्गावर येईल, याची आपण खात्री देतो. हे कलम रद्द केल्यापासून 5 ऑगस्टनंतर आजपर्यंत राज्यात एकही गोळी झाडली गेली नाही आणि एकाचाही मृत्यू झाला नाही असे शाह म्हणाले. राज्यातील 194 पोलीस ठाण्यांपैकी आता केवळ 10 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत निर्बंध आहेत आणि व्यापार चालू झालेला आहे. अनुसूचित जाती – जमाती – ओबीसींसाठी राजकीय आणि नोकरीमध्ये आरक्षण सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.