प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 -शालेय शिक्षण खात्यातील कामांचे अपडेट्स राहावेत व कामे जलद गतीने मार्गी लागावीत, यासाठी आता खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना डायरी बंधनकारक करण्यात आली आहे. या डायरीत दैनंदिन कामांची नोंद ठेवणे आवश्यक आहे. ते नसेल तर अधिकाऱ्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
विभागाला शिस्त लागावी, यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने हा फतवा काढला आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण विभागात विविध उपक्रम व नवनव्या संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रमुख कार्यालयांना भेटी देऊन त्या ठिकाणची वस्तुस्थिती, अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या. सेवा हमी कायद्याची सक्षमपणे अंमलबजावणी करण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. कामकाजात पारदर्शकता यावी, प्रलंबित कामे तातडीने निकाली निघावीत या दृष्टीने शिक्षण आयुक्तांनी अधिकाऱ्यांना वारंवार सूचनाही दिल्या आहेत.
कामात हलगर्जीपणा केल्यास शिस्तभंगाची कारवाईचा इशाराही अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. शिक्षण आयुक्तांनी आता अधिकाऱ्यांसाठी “मॉडेल डायरी’ची संकल्पना राबविण्याचे धोरण निश्चित केले आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून अधिकाऱ्यांना विविध कामांची प्राधान्यक्रम यादी तयार करुन देण्यात येणार आहे. याची डायरीच अधिकाऱ्यांना तयार करावी लागणार आहे. प्रत्येक महिन्यात करावी लागणारी कामे, कामांची सद्यःस्थिती, झालेली कामे, ठरवून दिलेली कामे न झाल्यास त्यांची कारणमीमांसा करणे आदीच्या नोंदी अधिकाऱ्यांना डायरीमध्ये ठेवाव्या लागणार आहे.