केंद्रीय मंत्री ठाकूर यांना कारणे दाखवा नोटीस

वादग्रस्त घोषणेवरून निवडणूक आयोगाचे पाऊल
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अनुराग ठाकूर यांना वादग्रस्त घोषणा दिल्याबद्दल निवडणूक आयोगाने मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. ठाकूर यांना नोटिसीला उत्तर देण्यासाठी 30 जानेवारीच्या दुपारी 12 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीमुळे प्रचाराचा धुरळा उडत आहे. त्या निवडणुकीतील भाजपच्या प्रचारासाठी सोमवारी ठाकूर एका सभेत सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (का) विरोधात निदर्शने करणाऱ्यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला. पुढे त्यांनी देश के गद्दारों को…अशी अर्धवट घोषणा दिली.

सभेला उपस्थित असणाऱ्यांनी गोली मारो…को असे म्हणत ती घोषणा पूर्ण केली. त्या घोषणेवरून मोठेच वादंग निर्माण झाले. ठाकूर यांच्यावर विविध स्तरांतून टीकेची झोड उठली. हिंसाचाराला चिथावणी दिल्याबद्दल त्यांच्यावर कारवाईचीही मागणी करण्यात आली.

त्यापार्श्‍वभूमीवर, दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवला. त्यानंतर आयोगाने ठाकूर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. याआधी दिल्लीतील भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांना त्यांनी मांडलेली वादग्रस्त भूमिका महागात पडली होती. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर 48 तासांची प्रचारबंदी घातली होती.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here