तीन बड्या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस

  • रेमडेसविरची अधिक दराने विक्री 
  • आदित्य बिर्ला, डी. वाय. पाटील व लोकमान्यला नोटीस

पिंपरी – रुग्णालयात ऍडमिट नसलेल्या बाहेरील रुग्णांला रेमडेसिवीर इंजेक्‍शन अधिक किंमतीने विकल्या प्रकरणी शहरातील तीन बड्या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आदित्य बिर्ला हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल यांचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे अधिष्ठाता तथा वैद्यकीय अधिक्षक यांना नोटीस बजावली आहे.

सध्याच्या परिस्थितीत रेमडेसविर इंजेक्‍शन महागड्या विक्रीमुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याची सखोल चौकशी करुन पुढील 48 तासात झालेल्या घटनेचा अहवाल द्यावा, असे नोटीसीत नमूद केले आहे. साथरोग अधिनियम, 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत आपणाविरूध्द आवश्‍यक कारवाई का करू नये? असे देखील म्हटले आहे.

शहरात दररोज दोन हजारांपेक्षा अधिक करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. या अत्यवस्थ रुग्णांवरील उपचाराकरिता रेमडेसविर इंजेक्‍शन लाभदायक ठरत असल्याने, या इंजेक्‍शनला अचानक मोठी मागणी वाढली आहे. त्याकरिता नागरिकांची मोठी धावपळ होत आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसविरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी राज्य सरकारला प्राप्त होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.