पिंपरी – संत तुकारामनगर येथील डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयाला करोनाबाधित रुग्णांना जास्त वैद्यकीय बिल आकारल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रुग्णालयाने वैद्यकीय समितीस वैद्यकीय बिले तपासणी दरम्यान योग्य ते सहकार्य न केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत देखील रुग्णालय प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
कोविड रुग्णांसाठी महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या दरांनुसार बिले असल्याबाबतची तपासणी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी सह आयुक्त आयकर विभाग एन.अशोक बाबू यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या समितीने संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाकडील 170 रुग्णांच्या वैद्यकीय बिलांची तपासणी केली असता शासन निश्चित दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बिल आकारणी केल्याचे आढळून आले आहे.
हॉस्पिटलने लॅबोरेटरी चार्जेस व एचआरसीटी चेस्ट चार्जेस शासन निश्चित दरांपेक्षा जास्त आकारल्याचे दिसून आले. लॅबोरेटरीमधील रिपोर्टस अपूर्ण असणे, वैद्यकीय सल्ल्याशिवाय रुग्णांना डिस्चार्ज देणे, करोनाबाधित रुग्णांना पीपीई कीट व औषधांसाठी वेगवेगळे दर आकारणे, रुग्णांची अपूर्ण संमती पत्रांवर स्वाक्षरी घेणे, रुग्णांची माहिती अद्यावत नसणे, करोना चाचणीचे दर आकारून त्याचे रिपोर्ट उपलब्ध नसण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.