डाई कोपरगाव बांधकाम व्यावसायिक संघटनेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
घरांच्या विक्रीत घट झाल्याने व्यावसायिक अडचणीत
कोपरगाव (प्रतिनिधी) – गेल्या चार वर्षांपासून सलग मंदीच्या सावटामध्ये बांधकाम व्यावसायिक सापडले आहेत. कोपरगावसह संपूर्ण देशभरात बांधकाम क्षेत्रात आर्थिक मंदीमुळे अडचणी आले आहेत. त्यात शासन पुन्हा रेडीनेकनरच्या दरात वाढ करण्याच्या विचारात आले. तरी शासनाने पुन्हा रेडीरेकनर दर अर्थात मिळकतीच्या वार्षिक मुल्य दर तक्त्यात नव्याने वाढ करू नये, या मागणीचे निवेदन क्रेडाई कोपरगाव बांधकाम व्यवसायिक संघटनेच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे, आमदार आशुतोष काळे यांना देण्यात आले.
सध्या बांधकाम क्षेत्र अडचणीतून जात आहे. मोठ मोठ्या इमारती बांधून तयार आहेत, पण त्या इमारतीला खरेदी करण्यासाठी ग्राहक नाहीत. आर्थिक उलाढाल मंदावल्याने ग्राहक नवीन घरे खरेदी करण्याचे प्रमाण घटले आहे. अशा स्थितीत बांधकाम व्यावसायिक आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्ण खचून गेले आहे. त्यात शासनाने 2 एप्रिलपासून रेडीरेकनरचे दर वाढविण्याच्या विचारात असल्याच्या चर्चेने बांधकाम व्यवसायाशी निगडीत सर्व व्यवसायिकांची पाचावर धारण बसली आहे.
आर्थिक मंदीने मेटाकुटीला आलेल्या बांधकाम व्यवसायिकांना तयार असलेल्या जुन्या इमारतींची (मिळकती) विक्री होत नसल्याने कर्जाच्या खाईत अडकलेल्या व्यावसायिकांना शासनाने सकारात्मक विचार करून सहकार्य करावा असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रसाद नाईक, उपाध्यक्ष विलास खोंड, सचिव चंद्रकांत कौले, राहुल भारती, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, माजी नगरसेवक दिनार कुदळे, मनीष फुलफगर, राजेश ठोळे, योगेश लोहाडे, सिद्धेश कपिले, हिरेन पापडेजा, प्रदीप मुंदडा, याकुब शेख, संदीप राहतेकर, के.एन.आसणे आदी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेत वरिष्ठ पातळीवर मांडून योग्य तो मार्ग काढणार असल्याचे आश्वासन दिले. तहसीलदार योगेश चंद्रे यांनी शासकीय पातळीवर बांधकाम व्यवसायिकांची सकारात्मक बाजू विचारात घेवून वरिष्ठांना कळविणार असे सांगितले.