कोश्‍यारी यांनी राज्यपाल पदावर राहावे की राहू नये?

शरद पवारांचा राज्यपालांना टोला

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे का उघडत नाहीत याबाबत वादग्रस्त पत्र पाठवून राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी संकट ओढवून घेतले होते. या पत्रात मुख्यमंत्र्यांना तुम्ही धर्मनिरपेक्ष झाला आहात का, असा प्रश्‍न कोश्‍यारी यांनी विचारला होता. यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

या पत्राला उत्तर देताना ठाकरे यांनी आम्हाला तुमच्या हिंदुत्वाच्या प्रशस्तीपत्राची गरज नाही, अशा आशयाचे खरमरीत पत्र पाठवले होते. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल कोश्‍यारी यांची तक्रार केली होती.

नुकतेच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रांत शब्द जपून वापरावयास पाहिजे होते, असे सांगितल्याने राज्यपाल यांना घरचा आहेर दिला होता. यावर आता पुन्हा शरद पवारांनी राज्यपालांना टोला हाणला आहे.

‘केंद्रीय गृहमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यपाल कोश्‍यारी यांनी आपल्या पदावर राहावं की नाही हे ठरवावं’, अशा शब्दात शरद पवार यांनी राज्यपाल कोश्‍यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.