Shashikant Shinde | सरकारविरोधात कोर्टात जाणाऱ्या अधिकाऱ्याच्या मालमत्तेची चौकशी करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांची राज्य सरकारकडे मागणी

पाचगणी (प्रतिनिधी) – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ज्या अधिकाऱ्याची बदली व्यवस्थित होते तो कोणताही विरोध करत नाही. परंतु काही कारणास्तव अधिकाऱ्यावर काही आरोप झाल्यास आणि त्याची बदली झाल्यास ते त्यास आव्हान देण्याचा प्रयत्न करतात. यातून राज्य सरकारची व गृहमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे.  यामागे बोलवते धनी हे वेगळेच आहेत. 

सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करुन सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी ‘प्रभात’शी बोलताना केली.

प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याने कर्तव्यात कुचराई केल्यामुळे त्याच्या झालेल्या बदलीचा बहाणा करुन केंद्रातील व राज्यातील भाजपचे काही नेते अशा अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन सरकारविरोधात कटकारस्थान करतात.  अशा नेत्यांचा महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा मनसुबा कधीच पूर्ण होणार नाही, असे  शिंदे यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांपासून सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. अधिकाऱ्यांची बदली केली म्हणून छुप्या पद्धतीने भाजपचे नेते सरकार विरोधात प्रशासनातील अधिकारी घेऊन डाव खेळत आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी राज्य सरकारने करावी, म्हणजे असे अधिकारी प्रामाणिकपणे काम करत होते की नाही हे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येईल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे आ. शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.