म्युच्युअल फंडाच्या फार्मा योजनांमध्ये गुंतवणूक करावी का?

करोनाच्या साथीचा जगभर उद्रेक झाल्यानंतर जगभरातील देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यावर औषध क्षेत्रातील म्युच्युअल फंड योजनांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष गेले. त्याआधी सुमारे चार ते पाच वर्षे या क्षेत्रात अतिशय मरगळ आलेली होती. करोनाच्या साथीनंतर वाढलेले औषधांचे सेवन आणि लसीवरील संशोधन यामुळे औषध कंपन्यांचे आणि या क्षेत्रातील म्युच्युअल फंड योजनांचे भाग्य फळफळले. या काळात या क्षेत्रातील म्युच्युअल फंड योजनांनी खूपच चांगला परतावा दिला.

फार्मा फंडांकडून या कालावधीत दहा ते वीस टक्‍क्‍यांपेक्षा जास्त परतावा मिळाल्यानंतर आता या योजनांमध्ये गुंतवणूक करावी का, असा प्रश्‍न अनेकांच्या मनात निर्माण झाला. या योजना सध्याच्या स्थितीत गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय आहे का, याची माहिती लोक घेऊ लागले.

खरे तर गुंतवणूकदारांनी नेहमीच परताव्याचा मागे धावणे योग्य ठरत नाही. पहिल्यांदा सध्या मिळालेल्या परताव्याचा विचार सोडून द्या आणि तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये फार्मा सेक्‍टरमधील योजनांचा समावेश आवश्‍यक आहे का याचा विचार करा. साधारणपणे विशिष्ट क्षेत्रात काम करणाऱ्या फंड योजनांची मग त्यामध्ये फार्मा क्षेत्रही आले. त्याची शिफारस सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी केली जात नाही. अशा योजनांच्या कामगिरीमध्ये एकूण अर्थकारणावर आधारित प्रचंड प्रमाणात चढउतार अनुभवायला येतात. 

अशा थिमॅटिक म्युच्युअल फंड योजना या मुळातच त्या विशिष्ट क्षेत्रातच गुंतवणूक करण्याचा उद्देश जाहीर करून आलेल्या असतात. त्यामुळे अशा योजनांतील जवळपास 80 टक्के गुंतवणूक ही निर्धारित क्षेत्रात केली जाते आणि तिथे प्रचंड चढ-उतारांचा अनुभव येत असतो. त्यामुळे अशा योजनांमध्ये बहुतेकवेळा श्रीमंत आणि जोखीम पचवण्याची क्षमता असलेल्यांनाच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. त्या क्षेत्राचे भवितव्य काय आहे यावरून त्या योजनेचा परतावा ठरणार असतो. त्यामुळे अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणे आणि बाहेर पडणे सर्वसाधारण गुंतवणूकदारांच्या दृष्टीने कठीण असते. त्याचबरोबर बहुतेकवेळा मोठे नुकसान पाहणे त्यांच्यासाठी अवघड ठरते. 

त्यामुळे फार्मा क्षेत्रासह अशा विशिष्ट क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या योजनांपासून सर्वसाधारण गुंतवणूकदारांनी लांब राहणे श्रेयस्कर ठरते. अशा गुंतवणूकदारांसाठी बहुविध क्षेत्रातील कंपन्यांत गुंतवणूक असणाऱ्या इक्विटी योजना योग्य ठरतात. कारण फार्मा क्षेत्र गेले आठ-दहा महिने चांगली कामगिरी करत असले तरी त्याआधी या क्षेत्रातील मरगळ कधी दूर होणार याचा कुणालाच अंदाज येत नव्हता.

आता करोनावरील प्रभावी लस आली आणि करोना गायब झाला तर काय होणार याचा फक्त आपण अंदाज बांधू शकतो. तुम्ही जेव्हा बहुविध क्षेत्रातील योजनांमध्ये (डायव्हर्सिफाईड फंड) गुंतवणूक करता तेव्हा ही सगळी कटकट फंड मॅनेजर सांभाळत असतो. त्यामुळे विशिष्ट क्षेत्रातील फंड योजनेतील गुंतवणुकीपेक्षा आपल्याला झेपणाऱ्या डायव्हर्सिफाईड फंडातील गुंतवणूक शांत झोप देणारी ठरते.

– चतूर 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.